शिखरजीवरून आले नऊ जण इथे झाले क्वारंटाईन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

शिखरजी (झारखंड) येथून आलेल्या नऊ यात्रेकरूंना नागज फाटा येथे अडविण्यात आले. त्यात सांगलीसह कोल्हापूर आणि बेळगावमधील यात्रेकरूंचा सहभाग होता.

सांगली : शिखरजी (झारखंड) येथून आलेल्या नऊ यात्रेकरूंना नागज फाटा येथे अडविण्यात आले. त्यात सांगलीसह कोल्हापूर आणि बेळगावमधील यात्रेकरूंचा सहभाग होता. सांगलीतील तिघांना मिरजेतील शासकीय तंत्रनिकेत महाविद्यालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोल्हापूर आणि बेळगावमधील सहा व्यक्तींना त्यांच्या हद्दीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे ताब्यात देण्यात आले आहे.

दरम्यान, येतगाव (ता. कडेगाव) येथील 4 व्यक्तींसह 66 जणांचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. 

शिराळा तालुक्‍यातील निगडी पाठोपाठ कासेगाव, कामेरी आणि येतगाव येथील व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाबाधितांची गावे तातडीने सील करण्यात आली असून, त्यांच्या कुटुंबासह संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. निगडी येथील 19 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यानंतर येतगाव (ता. कडेगाव) येथील 36 व्यक्तींचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 32 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले.

उर्वरित 4 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. 
दरम्यान, जिल्ह्यातील सीमा भागातून कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्‍यता असल्याने सीमा भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिखरजी (झारखंड) येथून 9 यात्रेकरू सांगली जिल्ह्यात येत असताना येथील नागज फाट्यावर त्यांना अडविण्यात आले. शिखरजीवरून ते आल्याचे समजल्यानंतर क्वारंटाईन करण्यात आले. सांगलीतील कसबे डिग्रज, कुपवाड आणि इनाम धामणीतील लोकांचा त्याचा समावेश होता. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दोघे आणि बेळगावमधील चार अशा नऊ जण व्यक्ती होते. 

सर्दी, ताप, खोकला आल्यास तपासा 
कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी केली जातेच; मात्र सर्दी, ताप, खोकलासह विविध लक्षणे जाणवल्यास तातडीने त्यांना मिरज येथील कोरोना स्क्रीनिंग ओपीडीमध्ये दाखल केले जाते. महापालिका आणि जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा यासाठी कार्यरत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 62 जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. ज्यांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसून आल्यास त्यांनी तातडीने स्क्रीनिंग ओपीडीमध्ये तपासणी करून घ्यावी. जेणेकरून कोरोनाचा धोका टळू शकतो, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine people came from Shikharji were quarantined here