
Nipani Election News: निपाणी विधानसभा मतदारसंघात नव्या चार हजार मतदारांची भर पडली
Nipani Election News : निपाणी विधानसभा मतदारसंघात नव्या चार हजार मतदारांची भर पडल्याने निवडणूक विभागाने तालुक्यात पुन्हा दोन मतदान केंद्रे (बूथ) वाढवून देण्याचा प्रस्ताव विभागाकडे पाठविला आहे.
मात्र त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. दोन मतदान केंद्रांची संख्या वाढली तर तालुक्यातील एकूण मतदान केंद्रांची संख्या २४८ वर पोचणार आहे.(Latest Marathi News)
निपाणी विधानसभा मतदार संघात २०१८ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदान केंद्रांची संख्या २४१ होती. त्यात निपाणी शहरात ४६ मतदान केंद्रे होती. उर्वरित केंद्रे ग्रामीण भागात होती.
२०१८ मध्ये मतदार संख्या वाढल्याने निपाणी शहरातील पाच मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. यामुळे निपाणीत एकूण मतदान केंद्रांची संख्या ४६ वरून ५१ झाली. (Marathi Tajya Batmya)
निवडणूक विभागाने प्रसिध्द केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार तालुक्यात २ लाख १९ हजार ९८५ मतदार आहेत. त्यात १ लाख ११ हजार २५३ महिला तर १ लाख ८ हजार ७३२ पुरुष मतदारांचा समावेश आहे. २०१८ मधील निवडणुकीच्या तुलनेत यंदा चार हजार नवीन मतदारांची नोंद मतदार यादीत झाली आहे.
यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढण्याची शक्यता होती. वाढीव मतदार लक्षात घेऊन निवडणूक विभागाने दोन केंद्रे वाढविण्याचा प्रस्ताव दिला आहे. नवीन मतदान केंद्रांना मंजुरी मिळाल्यास ते कोणत्या ठिकाणी वाढवायचे? हे अद्याप ठरलेले नाही.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने निवडणूक कार्यालयाने तयारी केली आहे. एकूण मतदार संख्येवर मतदार केंद्र सज्ज केली जाणार आहेत.
तालुक्यात मतदारांची संख्या काही प्रमाणात वाढली आहे. त्या प्रमाणात अद्याप मतदान केंद्रांची संख्या वाढलेली नाही. विभागाकडून त्याबद्दल स्पष्ट निर्देश नाहीत. सध्यातरी मतदारसंघात २४६ बूथ आहेत.
-विजयकुमार कडकोळ, तहसीलदार, निपाणी