निपाणी : सुरळीत बससेवेसाठी विद्यार्थ्यांनी केलेला रास्ता रोको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

paschim maharashtra

निपाणी : सुरळीत बससेवेसाठी विद्यार्थ्यांनी केलेला रास्ता रोको

निपाणी : अक्कोळ येथे बुधवारी सकाळी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सौरभ शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य बसस्थानकात विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. सुरळीत बसअभावी शाळेत जाण्यास विद्यार्थ्यांना विलंब होत असून कित्येकदा निपाणी आगारप्रमुखांना निवेदन दिले होते. मात्र आगाराने त्याकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन बुधवारी सकाळी 7 वाजता रास्ता रोको केला. सेवा सुरळीत न झाल्यास निपाणी बसस्थानकात आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

रास्ता रोकोमुळे परगावला जाणारे प्रवासी, कामगारांना अडचण निर्माण झाली. दोन तास रास्ता रोको केल्यामुळे अनेक बसेस थांबल्या होत्या. लांबपल्ल्याच्या बसेसही थांबल्यामुळे प्रवाशांना पुढील प्रवासास विलंब झाला. अनेक बसेस गळतगामार्गे खडकलाटवरून निपाणीला गेल्या. अक्कोळ बसस्थानक परिसरात सौरभ शेट्टींसह, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा. एन. आय खोत, भाऊसाहेब शेंडगे, रमेश मगदूम यांच्यासह इतरांनी रस्त्यावर खूर्च्या टाकून आंदोलन केले. आंदोलनात परिसरातील पाचशेहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्याने संपूर्ण परिसर विद्यार्थ्यांनी फुलून गेला होता. आंदोलनाची माहिती निपाणी आगार व्यवस्थापक मंजुनाथ हडपद यांना समजताच त्यांच्यासह वाहतूक नियंत्रक गिऱ्यापगोळ, ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी विद्यार्थ्यांसमवेत चर्चा करून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी सकाळी सात ते दहा या वेळेत अक्कोळला जादा बसेस सोडून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी केली. आंदोलनात स्वाभिमानी विद्यार्थी परिषद अध्यक्ष सौरभ शेट्टी, ग्रामपंचायत अध्यक्ष चंद्रकांत मुधाळे, गावकामगार राजू पाटील, माजी जि. पं. सदस्य चेतन स्वामी यांच्यासह आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, विद्यार्थी, विद्यार्थिनी, नागरिक सहभागी झाले होते.

हेही वाचा: दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

सौरभ शेट्टी म्हणाले, निपाणी विश्रामगृहात 10 नोव्हेंबरला बैठक घेऊन बसआगाराला निवेदन देऊन बोरगाव, गळतगा, अक्कोळ या तीन गावासाठी जादा बसची मागणी केली होती. आठवड्याभरात निर्णय न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. परंतु संबंधितानी लक्ष न दिल्याने हा रास्ता रोको केला. निपाणी आगार व्यवस्थापक मंजुनाथ हडपद, पोलिस उपनिरीक्षक अनिल कुंभार यांनी सौरभ शेट्टींसह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून जादा बस सोडण्याची मागणी केली. सेवा सुरळीत न झाल्यास पुन्हा निपाणी बसस्थानक आवारात आंदोलन करण्याचा इशारा दिला.

हेही वाचा: कंगना पुन्हा बरळली; स्वातंत्र्य, भीक आणि नेताजी बोस-भगतसिंगांबद्दल म्हणाली...

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रमेश पाटील, सुभाष चौगुले, विपुल पाटील, भाऊसो झिनगे, रमेश मगदूम, राकेश पाटील, राजू उपाध्ये, इंद्रजीत सोळांकुरे, शकुंतला तेली, लक्ष्मी मगदूम यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी, नागरिक उपस्थित होते.

loading image
go to top