
निपाणी : प्रवासापूर्वी तपासा टायरची हवा!
निपाणी : मागील २ महिन्यापासून निपाणी परिसरात तापमानाचा पारा ३९ पेक्षाही अधिक जात आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टायर फुटून अपघात होण्याच्या १२ घटना घडल्या आहेत. त्यात २ जण ठार झाले असून ९ जण जखमी झाले आहे. रविवारी (ता. १७) यमगर्णीजवळ चारचाकी वाहनाचे टायर फुटून केवळ दैव बलवत्तर म्हणून सहा जण बचावले आहेत. उन्हामुळे प्रवास करणाऱ्या वाहनांच्या टायरची हवा तापून टायर फुटण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे प्रवासादरम्यान सातत्याने टायरच्या हवेचा दबाव तपासणे गरजेचे झाले आहे.
मागील काही वर्षांत यंदा प्रथमच तापमानाने उंची गाठली आहे. त्यात काही ठिकाणी तापमान ४० अंशांपेक्षाही अधिक आहे. यामुळे वाहनांच्या टायरमधील हवाही तापून प्रसरण पावत आहे. वाहनासोबत असा प्रकार घडल्यास टायर फुटून गंभीर अपघात घडू शकतो. रखरखत्या उन्हात रस्ता तापलेला असतानाच त्यावर घर्षण होऊन टायरही तापत आहेत. शिवाय इंजिनही गरम होऊन पेट घेण्याची शक्यता असते. यामुळे उन्हाळ्यात लांबचा प्रवास करताना ठराविक अंतरावर वाहनाला विश्रांती दिली पाहिजे.
निपाणी परिसरात तापमान सध्या ३८ अंशांवर असले, तरीही मागील काही दिवसांपूर्वी ते ४१ अंशांवर पोहोचले होते. यामुळे त्या कालावधीत अनेकांनी घराबाहेरही निघायचे टाळले होते. मात्र ज्यांना कामानिमित्त प्रवास करावाच लागतो, त्यांच्यापुढे पर्याय नसतो. अशा वेळी आवश्यक खबरदारी घेतली पाहिजे.
उन्हाळ्यात टायरची घ्या काळजी
उन्हाळ्यात भर दुपारी कारने लांबचा प्रवास करायचा असल्यास हवा किती प्रमाणात आहे, ते तपासून घ्यावे. त्यानंतर नियमितपेक्षा काहीशी कमीच हवा टायरमध्ये ठेवावी. यामुळे उन्हाने हवा तापून प्रसरण पावली तरीही टायर फुटण्याचा धोका होत नाही. शिवाय ठराविक अंतरावर वाहनाच्या टायरवर पाण्याचा मारा केल्यास अधिकच उत्तम होऊ शकते.
'डांबरी रस्त्यांच्या तुलनेत सिमेंट रस्ते आणि टायर यांच्यात घर्षण जास्त होते. काँक्रिट रस्त्यांवर टायर लवकर गरम होतात. त्यामुळे उन्हाळ्यात टायर थंड ठेवण्यासाठी ठराविक अंतर गेले की विश्रांती द्यावी. अतिउष्णतेमुळे टायर गरम होऊन फुटतात. शिवाय टायरचे रबरही आकुंचन पावते. टायरला तडे जाण्याची शक्यता असते. त्यामुळे ठराविक अंतर पार केल्यानंतर टायर थंड करणे आवश्यक आहे. यासाठी मालवाहतूक, प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी भर उन्हात प्रवास टाळलेला बरा.'
-निलेश पठाडे,टायर विक्रेते, निपाणी
Web Title: Nipani Check Tires Before
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..