निपाणी शैक्षणिक तालुका : वेळेत अभ्यासक्रम संपविण्याचे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निपाणी शैक्षणिक तालुका : वेळेत अभ्यासक्रम संपविण्याचे आव्हान

निपाणी शैक्षणिक तालुका : वेळेत अभ्यासक्रम संपविण्याचे आव्हान

निपाणी : सध्या पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा व महाविद्यालये सुरळीत सुरु झाली आहेत. मात्र आता निर्धारीत वेळेत अभ्यासक्रम संपविण्याचे शिक्षकांसह गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आव्हान उभे ठाकले आहे. शिक्षण खात्याने कोरोना संसर्ग व लाॅकडाउन काळात आॅनलाईन वर्ग झाले असल्याचे गृहीत धरून वेळापत्रक ज्या-त्या शाळांना दिले आहे. मात्र ग्रामीण भागात, मोबाईल उपलब्ध नसणारया सामान्यवर्गातील असंख्य मुलांना आॅनलाईन धडे घेता आलेले नाहीत. मार्चपर्यंत शैक्षणिक वर्ष चालणार असून अभ्यासक्रम संपविताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कोरोना संसर्ग व लाॅकडाउनमुळे २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष आॅनलाईन शिक्षणात गेले आहे. २०२१-२२ या वर्षातील पहिले सत्रही कोरोना संसर्ग व लाॅकडाउनमध्ये गेले. दरम्यान पहिल्या सत्रात आॅनलाईन शिक्षण सुरुच होते. लाॅकडाउन शिथील झाल्यावर प्रारंभी महाविद्यालये व त्यानंतर माध्यमिक शाळा सुरु झाल्या. त्यानंतर सहावी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरु झाल्या. पंधरा दिवसापूर्वी पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग सुरु झाले आहेत. सध्या ५० टक्केहून अधिक अभ्यासक्रम पूर्ण झाला असल्याचे सांगितले जाते. मात्र आॅनलाईन शिक्षण सुरळीत पार पडले असल्याचे खात्याने गृहीत धरल्याने ज्यांनी आॅनलाईन शिक्षणात सहभाग घेतलेला नाही अशांची कोंडी झाली आहे.

हेही वाचा: सोलापुर : मंगळवेढ्यात कृषीपंपाच्या 275 कोटींची थकबाकी

खरेतर आॅनलाईन शिक्षण हे सर्वच विद्यार्थी किंवा पालकांना रुचलेले नाही. शिवाय त्याचे काही तोटेहे अधोरेखीत झाले आहेत. मात्र खात्याकडे दुर्लक्ष करून आॅनलाईन प्रणाली कायम ठेवली. पण ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाहीत, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा प्राथमिक धडे दिले जात आहेत. प्रामुख्याने ग्रामीण भागात गरीब, सामान्य विद्यार्थ्यांसाठी पहिल्या सत्रातील आॅनलाईनव्दारे दिलेल्या धड्यांची माहिती पुन्हा द्यावी लागत आहे. यामुळे पुढील अभ्यासक्रम घेताना अडथळे येत आहेत.

उच्च माध्यमिक व माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांच्या शाळा सप्टेंबरमध्येच सुरु झाल्याने सध्या त्यांचा अभ्यासक्रम टप्प्यावर आला आहे. मात्र पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळा पंधरा दिवसापूर्वी सुरु झाल्या आहेत. या विद्यार्थ्यांना अक्षर ओळख महत्वाची असते. अक्षर ओळखीचे धडे आॅनलाईन घेताना अडथळ्यांची शर्यत असते. त्यामुळे दीड वर्षाच्या खंडानंतर संभाव्य काळात अभ्यास घेताना शिक्षकांना नाकीनऊ येत आहेत. सध्या नियमित चाचणी परीक्षा घेण्याएेवजी निरंतर मूल्यमापन ठेवून एकच परीक्षा घेण्याचे आदेश आहेत. त्यामुळे पुढील नियोजन कसे करायचे, विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोचायचे असे अनेक प्रश्न शिक्षकांसमोर अनुत्तरीत आहेत.

"शिक्षण खात्याने दिलेल्या वेळापत्रकानुसार प्राथमिक व माध्यमिक शाळांचे वर्ग सुरु आहेत. लाॅकडाउन काळात आॅनलाईन वर्ग चालले आहे. प्राथमिक विभागात आॅनलाईन वर्ग घेताना अडथळे होते. मात्र सध्या नियमित शाळा भरत आहेत. वेळेत अभ्यास संपविण्याचे आव्हान सर्वांसमोरच आहे."

-रेवती मठद, गटशिक्षणाधिकारी, निपाणी

loading image
go to top