esakal | निपाणीत परतीच्या पावसाच्या दणक्याने नागरिकांची त्रेधातिरपीट I Rain
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

निपाणीत परतीच्या पावसाच्या दणक्याने नागरिकांची त्रेधातिरपीट

sakal_logo
By
राजेंद्र हजारे

निपाणी - निपाणी शहर आणि परिसरात गुरुवारी (ता. ७) सायंकाळी साडेचार वाजता परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सुमारे तासभर पडलेल्या या पावसामुळे शहरातील रस्ते आणि सखल भाग जलमय झाला होता. शिवाय सर्वसामान्य नागरिकांची मात्र अचानक आलेल्या पावसामुळे त्रेधातिरपिट उडाली. गुरुवारी आठवडी बाजारात असल्याने व्यापाऱ्यांची या पावसामुळे दयनीय अवस्था झाली. तर काही ठिकाणी भाजीपाला पाण्यातून वाहून गेल्याचे चित्र दिसून आले.

गेल्या आठवड्यापासून निपाणी शहर आणि ग्रामीण भागातील हवामानामध्ये बदल झाला आहे. पहाटे धुके, दिवसभर कडक उन्ह आणि सायंकाळी पाऊस होत असल्याने नागरिकांची पंचाईत होऊन बसली आहे. सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळेतच पाऊस झाल्याने अनेक विद्यार्थी व नोकरदार भिजतच जाताना दिसत होते. गुरुवारपासूनच नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असताना अनेक दुर्गादेवी उत्सव मंडळांच्या मंडपामध्ये पाण्याचे लोंढे वाहत होते. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाण्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. सुमारे तासभर झालेल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी व महामार्गाच्या बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहिले होते. पावसामुळे सायंकाळी पाच वाजताच वाहनांना दिवे लावून नेण्याची वेळ वाहनधारकांवर आली होती.

हेही वाचा: इचलकरंजी महापालिका खरोखरच होणार काय?

सध्या निपाणी परिसरात सोयाबीन काढणी व मळणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. मात्र अचानकपणे पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची मात्र तारांबळ उडाली. ग्रामीण भागात शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहिल्याने काढणी मळणीसह आंतरमशागतीची कामे ठप्प झाली. विजेच्या गडगडाटासह झालेल्या या पावसामुळे सर्वांचीच मोठी अडचण झाली. या काळात शहरातील काही भागातील वीजपुरवठा खंडित केल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले होते. दमदार पावसामुळे येथील पाणी व कचरा रस्त्यावरून वाहत होता. उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.

मोठे नाले ओव्हर फ्लो

दोन महिन्यापूर्वी झालेल्या पावसामुळे शहराबाहेरील अनेक मोठे नाले अोव्हर फ्लो होऊन नागरी वस्तीत पाणी शिरले होते. त्यावेळी नगरपालिका प्रशासनाने जेसीबी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने नाल्यांची स्वच्छता केली होती. पण पुन्हा गुरुवारी झालेल्या पावसामुळे अनेक नाले ओव्हर फ्लो होऊन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचे चित्र दिसून आले.

loading image
go to top