#SSCL 'निर्मला'ची 'शानभाग' वर मात;' पोदार'चा धावांचा पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 January 2020

सकाळ स्कूल क्रिकेट लीग स्पर्धेत आज (गुरुवार) सकाळी आठ वाजता गुरुकुल स्कूल विरुद्ध इक्रा इंग्लिश मीडियम स्कूल तसेच दुपारी साडेबारा वाजता न्यू इंग्लिश स्कूल विरुद्ध निर्मला कॉन्व्हेंट स्कूल यांच्यात लढत हाेणार आहे.
 

सातारा ः अनिश शिरसाटची नाबाद 87 धावांच्या खेळीसह अर्जुन वाघच्या साथीत केलेल्या 152 धावांच्या भागीदारीमुळे येथे सुरू असलेल्या सकाळ स्कूल क्रिकेट लीग स्पर्धेत निर्मला कॉन्व्हेंट स्कूलने केएसडी शानभाग विद्यालयावर आठ गडी राखून विजय मिळविला. या सामन्याची नाणेफेक सहायक वनसंरक्षक एस. बी. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली.

शानभाग विद्यालयाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शानभाग विद्यालयाच्या ओम खटावकर आणि ओम शिंदे या सलामीच्या जोडीने 16.4 षटकांत 141 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मात्र अन्य खेळाडूंना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. ओम खटावकरने 60 चेंडूत आठ चौकारांसह नाबाद 68 धावा केल्या. तसेच ओम शिंदेने 52 चेंडूत 11 चौकारांसह 67 धावा केल्या. शानभाग विद्यालयाच्या निर्धारित 20 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 168 धावा झाल्या. "निर्मला'च्या जैद शेख, पार्थ जाधव, अनिश शिरसाट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
 
विजयासाठी 169 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या निर्मला कॉन्व्हेंटच्या सलामीच्या जोडीतील अर्जुन वाघ आणि जैद शेख यांच्यातील जैद हा चार धावांवर बाद झाला. त्यानंतर अनिश शिरसाटची मैदानातील "एंट्री' धुमाकूळ घालून गेली. अनिशने अर्जुनच्या साथीत मैदानावर फटकेबाजी केली. या दोन्ही फलंदाजांना रोखण्यास "शानभाग'चे गोलंदाज अयशस्वी ठरले. "निर्मला'ची धावसंख्या 163 असताना अर्जुन आकाश पांडेकरच्या चेंडूवर पायचीत झाला. त्याने 49 चेंडूत दहा चौकारांसह 65 धावा केल्या. अनिशने 58 चेंडूत 12 चौकारांसह नाबाद 87 धावांची खेळी केली. त्याला आदित्य नलावडेची नाबाद तीन धावांची साथ मिळाली. "निर्मला'ने हा सामना 19.1 षटकांत 169 दावा करत दोन गड्यांच्या मोबदल्यात जिंकला. क्रीडाप्रेमी सुजित भोसले यांच्या हस्ते अनिश शिरसाट यास सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक देण्यात आले. 

'पोदार' ने पाडला धावांचा पाऊस 

दरम्यान, पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि इक्रा इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यातील सामना "पोदार'ने 204 धावांनी जिंकला. या सामन्याची नाणेफेक गजानन सुझुकीचे प्रोप्रायटर सचिन शेळके यांच्या हस्ते झाली. "पोदार'ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत निर्धारित 20 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 261 धावांचा पाऊस पाडला. प्रत्युत्तरात इक्रा संघास 9.2 षटकांत सर्व गड्यांच्या मोबदल्यात केवळ 57 धावा करता आल्या. क्रिकेटपटू केतन दोशी यांच्या हस्ते कौशल भडगावे यास सामनावीरचे पारितोषिक देण्यात आले. 

संक्षिप्त धावफलक 

पोदार इंटरनॅशनल स्कूल ः 20 षटकांत तीन बाद 261. (कपिल जांगीड 38-29 चेंडूत 7 चौकार, स्वयंभू स्वामी 39-24 चेंडूत 9 चौकार, कौशल भडगावे नाबाद 85-34 चेंडूत 15 चौकार, साहिल औताडे 58-28 चेंडूत 9 चौकार, एक षटकार, हर्षवर्धन देसाई नाबाद 10 - सात चेंडूत दोन चौकार, जैद शेख 4-38-3) वि. वि. इक्रा इंग्लिश मीडियम स्कूल ः 9.2 षटकांत सर्वबाद 57. (साद बागवान 12 - पाच चेंडूत एक चौकार, महंमद नोमन महंमद हुसेन झोजा 19-12 चेंडूत एक चौकार, आदित्य जाधव 4-21-4, अलोक गायकवाड 3- 9-3. चैतन्य खुस्पे 2-27-2)

हेही वाचा - गुरुकुलच्या विजयात शार्दुल, आर्य, अद्वैतची चमकदार कामगिरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirmala Convent School And Podar International School Won In Sakal School Cricket League 2020