esakal | सांगली महापालिकेच्या अंदाजपत्रकात करवाढ नाही : कापडणीस

बोलून बातमी शोधा

No tax increase in Sangli Municipal Corporation's budget : Kapdanis}

सांगली महापालिकेच्या अंदाज पत्रकात कोणतीही करवाढ केलेली नाही. गतवर्षी इतकेच यंदाचे अंदाजपत्रक असल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.

सांगली महापालिकेच्या अंदाजपत्रकात करवाढ नाही : कापडणीस
sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : गेली दोन वर्षे महापूर आणि कोरोनाच्या संकटामुळे महापालिका क्षेत्रात आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे यंदाच्या अंदाज पत्रकात कोणतीही करवाढ केलेली नाही. गतवर्षी इतकेच यंदाचे अंदाजपत्रक असल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. प्रशासनाचे अंदाजपत्रक उद्या (ता.3) स्थायी समितीकडे सादर केले जाणार आहे. 

आयुक्त कापडणीस म्हणाले,""महापूर आणि कोरोनामुळे नागरिकांचे अर्थचक्र ठप्प झाले होते. त्यातच गेल्या वर्षी महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी काही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे यंदाच्या अंदाज पत्रकात करवाढ केलेली नाही.'' 

ते म्हणाले,""महापालिका क्षेत्राच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी 50 चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी संस्थांनी तयारी दर्शविली आहे.'' 

ते म्हणाले,""शहरातील विविध चौकांच्या सुशोभीकरणासाठी सामाजिक संघटना, खासगी संस्था, शैक्षणिक संस्था, रुग्णालयांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील पुष्पराज चौक ते टाटा पेट्रोल पंपापर्यंतच्या रस्त्याच्या मधोमध असलेला भागाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी उद्योजकांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. पुष्पराज चौकापासून ते टाटा पेट्रोल पंपापर्यंत सायकल ट्रॅक, पादचारी मार्गही करण्यात येणार आहे. 

कुपवाड शहरासाठी 60 लाख रुपये खर्चून उद्यान केले जाणार आहे. आमराई उद्यानातही एक कोटी रुपयांच्या विकासकामे हाती घेतली आहे. त्यात धबधबा, सेल्फी पॉईंटचा समावेश आहे. गार्डन ट्रेन मात्र नेमीनाथनगर येथील बालोद्यानात स्थलांतरित केली आहे. 

घनकचऱ्यास वाहन खरेदी 

घनकचऱ्यासाठी 18 कोटी रुपयांच्या वाहन खरेदीला स्थायी समितीच्या मंजुरी नंतर शासनानेही मंजुरी दिली आहे. रोडस्वीपरसह अनेक मोठी वाहने महापालिकेकडून खरेदी केली जाणार आहेत. त्यामुळे कचरा उठावाची यंत्रणा अधिक सक्षम होईल, असेही कापडणीस यांनी सांगितले. 

आयुक्तांचे अधिकार इतर अधिकाऱ्यांना 

महापालिकेच्या छोट्या कामांसाठी नागरिकांच्या कामांच्या फाईली फिरत राहतात. त्यामुळे कामे प्रलंबित राहतात. हे टाळून कामे गतीने होण्यासाठी आणि नागरिकांचे हेलपाटे कमी करण्यासाठी आयुक्तांचे अधिकार इतर विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रदान करण्याचा विषय स्थायी समितीसमोर आला आहे. त्याला उद्याच्या सभेत मान्यता मिळण्याची शक्‍यता आहे. 

संपादन : युवराज यादव