आता कोरोना नसणाऱ्यांचीही होणार चाचणी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 23 August 2020

 चाचणीत विविध घटकांतील लोकांचा समावेश

बेळगाव : जिल्ह्यात येत्या मंगळवारपासून इम्युनिटी (रोगप्रतिकारशक्ती) सर्वेक्षण केले जाणार आहे. बंगळूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात त्याची सुरवात झाली असून आता त्याचा संपूर्ण राज्यात विस्तार करण्यात येईल. १८ हून अधिक वय, डॉक्‍टर, वैद्यकीय कर्मचारी, भाजीपाला व्यापारी, गर्भवती व परिवहन कर्मचाऱ्यांची सर्वेक्षणांतर्गत चाचणी केली जाणार आहे.

सद्य:स्थितीत जवळपास सर्व घटकांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मात्र, त्यापैकी काहींमध्ये सौम्य लक्षणे जाणवली असून काही दिवसांत ते विनाउपचार बरेही झाले आहेत. आता या स्वरुपाच्या व्यक्तींची माहिती सर्वेक्षणाद्वारे घेण्यात येणार आहे. बंगळूरमध्ये पहिल्या टप्प्यात आठ विभागांत सर्वेक्षण सुरु झाले असून पुढील आठवड्यात ३८ विभागांत विस्तार होईल. मध्यम व धोका असणाऱ्यांची माहिती सर्वेक्षणातून घेण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात आरोग्य खात्याचे आयुक्त पंकजकुमार पांडे यांनी या मोहिमेला चालना दिली आहे. 

हेही वाचा - विद्यार्थ्यांनो प्रवेश प्रक्रियेसंदर्भात ही आहे महत्वाची सुचना...

त्यानुसार गर्भवती, प्रसूत महिला, बाह्यरुग्ण सेवेसाठी (ओपीडी) येणारे मध्यम आणि गंभीर प्रकृती असणाऱ्यांची इम्युनिटी टेस्ट होईल. तसेच बसवाहक, ऑटो चालक, भाजीपाला विक्रेते, डॉक्‍टर, वैद्यकीय कर्मचारी, लॅब तज्ज्ञ, रेडिओग्राफर, रुग्णवाहिका चालक व कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, कंटेन्मेंट झोनमधील सर्वांचीच वैद्यकीय तपासणी होईल. मॉल आणि रिटेल व्यापारी, बसस्थानक आणि रेल्वे स्थानकातील नियमित प्रवाशांची तसेच कर्मचाऱ्यांही इम्युनिटी चाचणी होईल.

सफाई कर्मचारी, ६० पेक्षा अधिक वय झालेले, किडनी समस्या, हृदयरोग, कॅन्सर, मधुमेह आणि कोरोनाचा अधिक धोका असलेल्यांची तपासणी करून त्यांच्यात प्रतिकारशक्ती वाढली आहे का, याची माहिती घेतली जाणार आहे. सर्वेक्षण निम्हान्सचे विभागीय संचालक डॉ. व्ही. रवी, विषाणूतज्ज्ञ डॉ. अनिता, डॉ. गिरीधर बाबू आदींसह आरोग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सर्वेक्षण चालेल.

महाराष्ट्रानंतर कर्नाटकात सर्वेक्षण 

शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. त्यामुळे नॉन कोविड रुग्णांची रोगप्रतिकारशक्‍ती (इम्युनिटी) चाचणी होत आहे. यात मुंबई, पुणे, बंगळूर, दिल्लीसह देशातील महत्त्वाच्या शहरांत सर्वेक्षण करून माहिती घेतली आहे. या धर्तीवर कर्नाटकात सर्वेक्षणाद्वारे माहिती घेतली जाईल. या स्वरुपांच्या व्यक्तींची प्लाझ्मा थेरपीसाठी मदत मिळू शकते का, याचाही अभ्यास सुरू आहे. 

हेही वाचा - काँग्रेसच्या आणखी एका आमदारांना कोरोनाची लागण..

संपर्कातील लोकांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन...

"कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात इम्युनिटी सर्वेक्षण सुरू आहे. यात नॉन-कोविड व्यक्तींचा समावेश असेल. येत्या मंगळवारपासून त्याची बेळगाव जिल्ह्यात सुरवात होणार असून मध्यम व सर्वाधिक धोका असलेल्या व्यक्तींची माहिती सर्वेक्षणाद्वारे घेतली जाईल."

- डॉ. तुकाराम तुक्कार, जिल्हा दक्षता अधिकारी

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: non covid people also test of immunity survey in belgaum