आता क्रीडा शिक्षकही पोलिसांच्या रडारवर; बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणात दलालाची भुमिका 

प्रमोद जेरे
Tuesday, 20 October 2020

बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणात क्रीडाधिकारी, पोलिस उपनिरीक्षक, उपशिक्षणाधिकाऱ्यांपाठोपाठ आता जिल्ह्यातील शिक्षक आणि क्रीडा शिक्षकही पोलिसांच्या रडारवर आहेत.

मिरज (जि . सांगली) : बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणात क्रीडाधिकारी, पोलिस उपनिरीक्षक, उपशिक्षणाधिकाऱ्यांपाठोपाठ आता जिल्ह्यातील शिक्षक आणि क्रीडा शिक्षकही पोलिसांच्या रडारवर आहेत.

\मिरजच्या दीपक सावंत, विजय बोरकर, उपशिक्षणाधिकारी रवींद्र आबासाहेब सावंत (रा. कामेरी, ता. वाळवा) त्याचा भाऊ सतीश सावंत यांच्या अटकेनंतर मोठ्या रॅकेटचा छडा पोलिसांना लागला आहे. या प्रकरणी सध्या नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर येथील पोलिस यंत्रणा तपास करीत आहेत.

यापैकी नागपूर पोलिसांच्या तपासात मूळचा बीडचा असलेल्या आणि सध्या सांगलीमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एका शिक्षकाचे नाव घोटाळ्यात दलाली केल्याप्रकरणी पुढे आले आहे. दोन दिवसापासून संबंधित शिक्षकाचा शोध नागपूर जिल्ह्यातील मानकापूर पोलिसांकडून सुरू आहे. 
मानकापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभारी क्रीडा उपसंचालक अविनाश पुंड यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर तीन ऑक्‍टोबर रोजी रवींद्र सावंत या उपशिक्षणाधिकाऱ्यास त्याच्या (कामेरी ता. वाळवा) येथे घरातून अटक केली.

त्याच्याकडील चौकशीतून आणखी काही नावे निष्पन्न झाली. तत्पूर्वी त्याचा भाऊ सतीश सावंत यालाही पोलिसांनी अटक केली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती राज्यव्यापी असल्याने यामध्ये मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्‍यताही वर्तविली जात आहे. रवींद्र सावंत हा राज्य लोकसेवा आयोगाच्या निवड प्रक्रियेत उत्तीर्ण झाल्यानंतर वर्धा येथे उपशिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाला. त्याची अलिकडेच कोल्हापूर येथे बदली झाली.

अधिकाऱ्यांना रवींद्रच्या क्रीडा प्रमाणपत्राबाबत शंका आल्याने त्याचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठविण्यात आले असता ते पडताळणीत ते बनावट निघाले. काही दिवसांपूर्वी रवींद्रचा भाऊ संजय सावंतलाही याच प्रकरणात मानकापूर पोलिसांनी अटक केली तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न रंगविणाऱ्या संजयनेही महाराष्ट्र राज्य आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन बनावट क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्याही प्रमाणपत्रातील तारखेत खाडाखोड आढळली. 

जामीन फेटाळल्याने सूत्रधार फरार... 
बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणात बोगस खेळाडू आणि क्रीडा अधिकाऱ्यांना अटक झाल्यानंतर, आता या घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार आणि त्याचे दलाल पोलिसांच्या रडारवर आहेत. या प्रकरणी अटक होण्याची शक्‍यता लक्षात घेता एकाने न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळून लावल्याने कोणत्याही क्षणी त्याला अटक होणार आहे. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now even sports teachers are on the police radar; The role of the broker in the fake sports certificate case