अशीही तऱ्हा : कोरोनाशी लढणाऱ्या परिचारिकांची सुरक्षा रामभरोसे

प्रवीण जाधव
रविवार, 29 मार्च 2020

विलगीकरण वॉर्डमधील गैरसोयींमुळे परिचारिकांना सुरक्षिततेची धास्ती आहे. त्यामुळे याबाबतचे गाऱ्हाणे त्यांनी आज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांच्यापुढे मांडले. त्यानंतर त्यांना काही सुरक्षा किट उपलब्ध करून देण्यात आले; परंतु ते कायम उपलब्ध राहतील याची खबरदारी आरोग्य विभागाने घेतली पाहिजे, तसेच अन्य उपाययोजनाही तातडीने करणे आवश्‍यक आहे.

सातारा : संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोना आजाराशी दोन हात करण्याच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या परिचारिकांच्या सुरक्षितेबाबत जिल्हा रुग्णालयातील व्यवस्थापनाला पुरेसे गांभीर्य नसल्याचे समोर येत आहे. सुरक्षिततेच्या किटसह अन्य सुविधांसाठी त्यांना झगडावे लागत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.
 
संपूर्ण जगाला कोरोना संसर्गाने ग्रासले आहे. त्याच्याशी मुकाबला करण्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत ते आरोग्य कर्मचारी. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्यांना वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही काही ठिकाणी जीव गमवावा लागला आहे. कोरोना बाधित रुग्ण ठेवण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात काम करणारे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला सर्वाधिक भीती आहे. याची जाणीव असल्यामुळे केंद्र शासनाने सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा खास विमाही उतरवला आहे. एखाद्या आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्याला कोरोना संसर्गामुळे जीव गमवावा लागल्यास त्याच्या कुटुंबाला या विम्याचा फायदा होणार आहे; परंतु प्रत्यक्ष कर्मचारी काम करत असतानाही त्याला सुरक्षिततेची आवश्‍यकती सर्व उपकरणे व सुविधा पुरवणेही शासकीय यंत्रणेचे तितकेच कर्तव्य आहे. जिल्हा रुग्णालयात मात्र, ही गोष्ट फारशी गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही.
 
शनिवार (ता.28)पर्यंत जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये 28 जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील 24 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर दोघांची अद्याप प्रतीक्षा आहे. दोन रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नुमने मात्र, पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षातच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत या वॉर्डमध्ये काम करणाऱ्या सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या किटची आवश्‍यकता आहे; परंतु आजपर्यंत या रुग्णाच्या अत्यंत जवळून उपचारात सहभागी असणाऱ्या परिचारिकांना सुरक्षिततेचे योग्य किट अद्याप देण्यात आले नव्हते. त्याचबरोबर याठिकाणी काम करणाऱ्यांना हात धुण्यासाठी, कपडे बदलण्यासाठी, डबा खाण्यासाठी किंवा थोड्या विश्रांतीसाठीही स्वतंत्र जागेची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे या परिचारिकांना दुसऱ्या वॉर्डमध्ये जाऊन डबा खावा लागत आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. सर्व नागरिकांना सुरक्षिततेसाठी काय काय करणे आवश्‍यक आहे हे सांगण्याऱ्या आरोग्य विभागाने किमान विलगीकरण वॉर्डातरी पुरेशा उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. 

...अन्यथा ठेकेदार, बिल्डर्स यांच्यावर गुन्हा दाखल होणार 
 

जिल्हा शल्यचिकित्सकांसमोर गाऱ्हाणे 

विलगीकरण वॉर्डमधील गैरसोयींमुळे परिचारिकांना सुरक्षिततेची धास्ती आहे. त्यामुळे याबाबतचे गाऱ्हाणे त्यांनी आज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांच्यापुढे मांडले. त्यानंतर त्यांना काही सुरक्षा किट उपलब्ध करून देण्यात आले; परंतु ते कायम उपलब्ध राहतील याची खबरदारी आरोग्य विभागाने घेतली पाहिजे, तसेच अन्य उपाययोजनाही तातडीने करणे आवश्‍यक आहे.

मटण विक्री पडली महागात; जिल्हा प्रशासन सतर्क


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nurses From Civil Hospital Satara Needs Secured Facilites