बाबो.. बिबट्या घुसला नगरमध्ये 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

गेल्या दोन दिवसांपासून केडगाव परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने या भागात पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे. 

नगर: जिल्ह्यात अनेक गावांमध्ये बिबट्याची दहशत आहे. निघोज, संगमनेर तालुक्‍यातील लोकांचे जीणेच हराम झाले आहे. प्रातर्विधीसाठी जातानाही ते एकमेकांची सोबत करतात. रात्री शेतात पिकांना पाणी भरण्यास जातानाही सोबत विजेरी किंवा अन्य संरक्षणाचे साहित्य ठेवतात. ही झाली गावाकडची कथा. तो जंगलातील बिबट्या थेट नगरमध्ये घुसला आहे. त्याचे दर्शन झाल्याने केडगावसह नगर शहरातील नागरिक घाबरून गेले आहेत. 

गेल्या दोन दिवसांपासून केडगाव परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने या भागात पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे. 

केडगाव येथील देवी रस्त्यावर काल (ता. 16) रात्री आठच्या सुमारास माजी नगरसेवक सुनील कोतकर यांना बिबट्याने दर्शन दिले. रस्त्याने जाताना 10 फुटांवरून बिबट्या गेल्याचे कोतकर यांनी सांगितले. या बाबत त्यांनी नगरसेवक मनोज कोतकर व इतरांना माहिती दिली. त्यानंतर आज सकाळीही आणखी दोघांना बिबट्याने दर्शन दिले. नगरसेवक कोतकर, तान्हाजी पवार, लक्ष्मण कोतकर, सुनील कोतकर, गणेश नन्नवरे, सुभाष कोतकर, बच्चन कोतकर आदींनी या परिसरात फिरून पाहणी केली. 

जाणून घ्याआक्रीतच, वडिलाने मुलीवर...

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी आले. वन अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. त्यात त्यांना कुठेही बिबट्याचे ठसे आढळून आले नाहीत. मात्र, तरीही बिबट्या दिसल्यानंतर घ्यायच्या खबरदारीबाबत त्यांनी नागरिकांना माहिती दिली. दरम्यान, बिबट्याच्या धास्तीने या परिसरातील शेतमजुरांनी दुपारीच घर गाठले. आता नागरिकही घराबाहेर पडण्यास धजावत नसल्याने वेगळेच संकट उभे राहिले आहे. 

देवी रस्त्यावर गुरुवारी रात्री आपल्या समोरून दहा फुटांवरून बिबट्यास जाताना पाहिले आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने या परिसरात पिंजरा लावावा. 
- सुनील कोतकर, माजी नगरसेवक 

केडगाव परिसरात पाहणी केल्यानंतर बिबट्याचे ठसे मिळून आलेले नाहीत; परंतु खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन खबरदारीबाबत मार्गदर्शन केले. बिबट्या दिसल्यावर तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा. 
- सुनील थिटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, नगर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: o god, leopard come in ahmednagar