esakal | दफ्तर दिरंगाई : एसटीच्या अनेक कामगारांच्या ऑक्‍टोबरच्या वेतनात कपात
sakal

बोलून बातमी शोधा

October pay cuts for many ST bus workers

एसटी कामगारांना तीन महिन्यांचे थकीत वेतन आणि सण उचल देऊन प्रशासनाने दिवाळी गोड केली; परंतु ऑक्‍टोबरचे वेतन अनेकांना कपात होऊन मिळाले.

दफ्तर दिरंगाई : एसटीच्या अनेक कामगारांच्या ऑक्‍टोबरच्या वेतनात कपात

sakal_logo
By
घनशाम नवाथे

सांगली : एसटी कामगारांना तीन महिन्यांचे थकीत वेतन आणि सण उचल देऊन प्रशासनाने दिवाळी गोड केली; परंतु ऑक्‍टोबरचे वेतन अनेकांना कपात होऊन मिळाले. दफ्तर दिरंगाईमुळे प्रशासनाकडून वेळेत माहिती पोहोच न झाल्यामुळे उपलब्ध माहितीच्या आधारे वेतन काढले गेले. त्यामुळे पुरवणी वेतन पत्रक काढून कामगारांना कपात झालेले वेतन द्यावे, अशी मागणी होत आहे. 

एसटी कामगारांचे जुलैचे वेतन दिल्यानंतर परत ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्‍टोबरचे वेतन थकीत राहिले. या वेतनासाठी कामगार संघटनांनी त्यांच्या स्तरावर पाठपुरावा केला. त्यानंतर नऊ नोव्हेंबरला ऑगस्ट महिन्याचे वेतन जमा करण्यात आले. त्यानंतर उर्वरित दोन महिन्यांचे वेतन, सणाची उचलही दिवाळीपूर्वी मंजूर करून खात्यावर जमा करण्यात आली. त्यामुळे एसटी कामगारांची दिवाळी यंदा गोड झाली; परंतु ऑक्‍टोबरचे अर्धेच वेतन अनेक कामगारांना मिळाले आहे. दफ्तर दिरंगाईचा फटका जिल्ह्यातील प्रत्येक आगारातील काही कामगारांना बसला आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एसटी बसेसच्या फेऱ्या मर्यादितच होत्या. त्यामुळे अनेकांना दररोज काम नव्हते. ज्या कामगारांना काम नाही, त्यांच्याकडून प्रशासनाने रजेचे अर्ज घेण्याचे काम सुरू केले. ऑक्‍टोबर महिन्यातील कामगारांचे रजेचे अर्ज वेळेत पोहोचले नाहीत.

त्यामुळे थकीत वेतन जमा करताना जिल्हास्तरावर अचानक माहिती मागवण्यात आली. तेव्हा उपलब्ध माहितीच्या आधारे वेतनाचा आकडा कळवला गेला. ज्यांचे रजेचे अर्ज वेळेत गेले नाहीत त्यांना वेतन कपात होऊनच मिळाले. शासनाने तीन महिन्यांच्या वेतनाची रक्कम एसटी प्रशासनाला दिली आहे. त्यामुळे ऑक्‍टोबरचे वेतन पूर्ण मिळावे, अशी मागणी आहे. 

प्रशासनाने पुरवणी वेतन पत्रक काढून मंजुरी घेऊन तत्काळ कामगारांना उर्वरित वेतनाची रक्कम द्यावी, अशी मागणी होत आहे. 

संपादन : युवराज यादव