' टेंभू ' ला अडथळा मनुष्यबळाचा ; अधिकाऱ्यांची निवडणुकीसाठी नियुक्त

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 October 2019

सातारा लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने टेंभू व्यवस्थापनाचे सर्वच्या सर्व अधिकारी, कर्मचारी नियुक्त केल्यामुळे योजना कशी चालवायची? हा व्यवस्थापनापुढे पेच आहे.

कऱ्हाड  ः सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील काही भाग दुष्काळीस्थिती असल्यामुळे टेंभू योजनेद्वारे त्या भागाला पाणी देण्यात येत आहे. मात्र, निवडणुकीच्या कामासाठी योजनेचे सर्वच अधिकारी, कर्मचारी नियुक्त केल्याने योजना बंद करण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे दुष्काळ महत्त्वाचा की निवडणूक या निमित्ताने पेच निर्माण झाला आहे. 

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत महापुराची स्थिती निर्माण झाली. मात्र, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, तसेच सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी पुराच्या काळात वाहून जाणाऱ्या पाण्यापैकी सुमारे अर्धा टीएमसी पाणी उचलून "टेंभू'द्वारे दुष्काळी भागाला देण्यातही आले. कृष्णा नदीला आलेल्या महापुरात टेंभू योजनेचे पंपगृह पाण्यात गेल्यामुळे मोटारींचे मोठे नुकसान झाले. त्याची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू होती.

दुरुस्तीनंतर पंपगृह सुरू करून दुष्काळी भागाला 16 सप्टेंबपासून पाणी देण्यास सुरवात झाली. मात्र, सातारा लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने टेंभू व्यवस्थापनाचे सर्वच्या सर्व अधिकारी, कर्मचारी नियुक्त केल्यामुळे योजना कशी चालवायची? हा व्यवस्थापनापुढे पेच आहे. दुष्काळासारख्या गंभीर परिस्थितीत अधिकारी असणे गरजेचे असताना राष्ट्रीय कर्तव्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवडणुकीचे कामही तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, या दोन्ही संवेदनशील विषयांमुळे अधिकाऱ्यांची कोंडी होताना दिसत आहे.

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्‍यामध्ये दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. तेथे टेंभू योजनेद्वारे पाणी दिले जात आहे. सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या योजनेचे गांभीर्य ओळखून आवश्‍यक अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून योजनेच्या कामासाठी मोकळे करण्याची गरज आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Officers appointed for election duty obstruct manpower of 'Tembu'