भरमसाठ वैद्यकीय बिलांवरून अधिकारी धारेवर...नगरसेवकांचा हल्लाबोल : पाचशे खाटांचे कोविड रुग्णालय उभे करा 

जयसिंग कुंभार
Friday, 7 August 2020

सांगली-  भरमसाठ वैद्यकीय बिले आकारण्यावरून आज महापालिकेच्या आढावा बैठकीत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गेले काही दिवस रुग्णांची लुट होत असताना दाद तरी कोणाकडे मागायची याबद्दल कोणताच खुलासा होत नव्हता. अखेर प्रशासनाने आज संबंधित रुग्णालयाकडे नेमलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक जाहीर केले. महापालिकेने स्वतःचे कोविड रुग्णालय उभे करावे अशी मागणी नगरसेवकांनी केली. 

सांगली-  भरमसाठ वैद्यकीय बिले आकारण्यावरून आज महापालिकेच्या आढावा बैठकीत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गेले काही दिवस रुग्णांची लुट होत असताना दाद तरी कोणाकडे मागायची याबद्दल कोणताच खुलासा होत नव्हता. अखेर प्रशासनाने आज संबंधित रुग्णालयाकडे नेमलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक जाहीर केले. महापालिकेने स्वतःचे कोविड रुग्णालय उभे करावे अशी मागणी नगरसेवकांनी केली. 

कोविड रुग्णांचे हाल सुरु असताना लोकप्रतिनिधींचे आश्‍चर्यकारक मौन होते. दोन्ही मंत्री गेले आठवडाभर शहरात फिरकले नाहीत. खासदार-आमदारही मौनात आहेत याबद्दल संतापाची भावना व्यक्त होत असताना आज सत्ताधारी भाजप नेत्यांनी आढावा बैठकीच्या निमित्ताने प्रथमच कोविड रुग्णांच्या लुटीवर तोंड उघडले. सर्वपक्षीय नगरसेवकांनीही आज प्रशासनावर ताशेरे ओढले. 

उपचाराचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर जात आहे. त्यामुळे सर्वच कोविड रुग्णांवर मोफत उपचार करावेत तसेच महापालिकेने स्वतःचे कोविड रुग्णालय उभे करावे अशी मागणीही नगरसेवकांनी केली. महापौर गीता सुतार तसेच जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, उपमहापौर आनंदा देवमाने, स्थायी समिती सभापती संदीप आवटी यावेळी उपस्थित होते 

कॉंग्रेसचे नगरसेवक अभिजीत भोसले, राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णू माने, भाजपचे गजानन मगदुम यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळेच रुग्णांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत असा थेट आरोप केला. जनआरोग्य योजनेत असलेल्या तसेच काही खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट सुरु आहे. पैसे भरल्याशिवाय रुग्णांना दाखल करुन घेतले जात नाही. बिलांसाठी हेळसांड केली जाते. त्यांच्यावर अंकुश कोणाचा असा सवाल केला. त्यानंतर मनपाने 500 बेडचे कोविड हॉस्पिटल उभे करावे अशी मागणी सर्वांनी केली. 
यावेळी नगरसेवक लक्ष्मण नवलाई, संगीता खोत, वर्षा निंबाळकर, भारती दिगडे यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी व भाजपाचे अन्य नगरसेवक उपस्थित होते. 

"तुम्ही' बसून काय करता? 
खासगी डॉक्‍टर पंधरा दिवसात कोविड सेंटर उभा करतो. त्याचे प्रशासन कौतूक करता. मग तुम्ही इथे बसून काय करता? त्यापेक्षा मनपाने स्वत:च तिन्ही शहराच्या मध्यभागी 500 बेडचे कोवीड सेंटर उभे करावे आणि सर्वांवर मोफत उपचार करावेत असे आवाहन नगरसेवकांनी केली. खासदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना सुनावताना लोकांना विश्‍वासात घेऊन काम करा, मनमानी करु नका अशा शब्दात वाभाडे काढले. 

लोकप्रतिनिधींच्या मागण्या 
0अँटीजेन चाचण्यांबाबत शंका दूर करा. 
0 जन आरोग्य योजनेच्या दराचे माहितीपत्रक जाहीर करा 
0 प्रभाग समित्या ऍक्‍टिव्ह करा, त्यांच्या बैठका घ्या 
0 अवाजवी बिले उकळणाऱ्या रुग्णालयांच्यावर कारवाई करा 
0 रुग्णसेवा टाळल्याबद्दल केवळ कर्मचाऱ्यांवर कारवाई नको. 

यांच्याकडे करा तक्रारी 
महापालिकेच्यावतीने आज कोविड रुग्णालयांवर लेखाधिकारी नियुक्त करून त्यांचे क्रमांक जाहीर करण्यात आले. जादा बिलाबाबतच्या तक्रारी त्यांच्याकडे कराव्यात असे आवाहन आयुक्त नितिन कापडणीस यांनी केले आहे. रुग्णालय व त्यांचे अधिकारी असे, कंसात संपर्क क्रमांक 
मिशन-रोहन शेटे (8275470410), सेवासदन- रविकिरण पाटील (8588626737), मेहता हॉस्पिटल-चंद्रकांत पाटील (8275592807), श्‍वास हॉस्पिटल-दादासाहेब ढाणे (9404990492), घाटगे हॉस्पिटल-राहुल हसबे (7385138719), कुल्लोळी हॉस्पिटल-प्रकाश देसाई (9975097276), विवेकानंद हॉस्पिटल-भिमराव डोणे (8600025001) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Officers on edge over huge medical bills . Corporators attack: Build 500-bed Kovid hospital