बदल्यांचा हंगाम झाला सुरु.. वाचा कोणकोणत्या विभागांत होणार बदल्या..

विष्णू मोहिते
Wednesday, 15 July 2020

सन 2020-21 या वर्षातील रखडलेल्या शासकीय अधिकारी-कर्मचारी बदल्या 31 जुलैपर्यंत होणार आहेत. शासनाने तसे आदेश काढलेत.

सांगली ः सन 2020-21 या वर्षातील रखडलेल्या शासकीय अधिकारी-कर्मचारी बदल्या 31 जुलैपर्यंत होणार आहेत. शासनाने तसे आदेश काढलेत. प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या वगळता महसूल, पोलिस, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेसह सर्व शासकीय विभागातील कार्यरत पदांच्या 15 टक्के या बदल्या करता येणार आहेत. 

प्रत्येक वर्षी वित्तीय वर्षात एप्रिल आणि मेमध्ये प्रशासकीय, विनंती बदल्या केल्या जात होत्या. मात्र यावर्षी राज्यात कोरोना प्रभाव असल्याने बदली प्रक्रिया राबवू नये, असे आदेश होते. तालुकास्तर व जिल्हास्तर या बदल्या केल्या जातात. कोरोना प्रभाव रोखण्यासाठी कार्यरत कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्या सेवेत खंड पडू नये, यासाठी शासनाने या बदल्या रोखल्या होत्या. एका विभागात 10 वर्षे सेवा झाली असल्यास कर्मचाऱ्याची बदली केली जाते. तर तीन वर्षे एका झाल्यावर झाल्यास अधिकाऱ्याची बदली केली जाते. एका जागेवर चार वर्षे झाल्यास कर्मचाऱ्यांची विनंती बदली केली जाते. 

महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव गीता कुलकर्णी यांनी सुधारित आदेश जारी केला आहे. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील तरतूदीनुसार राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सर्वसाधारण बदल्या प्रत्येक वर्षी एप्रिल, मे महिन्यात करण्यात येतात. परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा वित्तीय वर्षात 31 मेपर्यंत करावयाच्या सर्वसाधारण बदल्या 31 जुलैपर्यंत त्या त्या संवर्गातील कार्यरत पदांच्या 15 टक्के बदल्या कराव्यात, असे आदेशात नमूद केले आहे. 

...तरच विशेष बदली 

सर्व साधारण बदल्या व्यतिरिक्त काही अपवादात्मक परिस्थितीत किंवा विशेष कारणांमुळे बदल्या करावयाच्या असल्यास या बदल्या सुद्धा करता येणार आहेत. त्याला शासनाने परवानगी दिली आहे. मात्र 31 जुलैपर्यंत बदल्या करता येतील.

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Officers, staff transfer's season began at sangali