कोल्हापूरः साळवनजवळ अपघातामध्ये वृद्धा ठार 

भूषण पाटील
सोमवार, 22 एप्रिल 2019

एक नजर

  • भरधाव मोटार शेतात घुसून झालेल्या अपघातात वृद्धा ठार
  • अन्य दोन महिला जखमी
  • आज दुपारी साळवन जवळील मार्गेवाडी वळणावर अपघात
  • अंबू बाई एकनाथ पडवळ (वय 62) असे मृत वृद्धेचे नाव
  • सुजाता संभाजी शिंदे (वय 40), सविता गंगाराम पडवळ (वय 42 दोघी रा साळवण) अशी जखमींची नावे. 

कोल्हापूर - भरधाव मोटार शेतात घुसून झालेल्या अपघातात वृद्धा ठार झाली तर अन्य दोन महिला जखमी झाल्या आहेत. आज दुपारी साळवन जवळील मार्गेवाडी वळणावर हा अपघात झाला. अंबू बाई एकनाथ पडवळ (वय 62) असे मृत वृद्धेचे नाव आहे. सुजाता संभाजी शिंदे (वय 40), सविता गंगाराम पडवळ (वय 42 दोघी रा साळवण) अशी जखमींची नावे आहेत. 

याबाबतची अधिक माहिती अशी: साळवण येथील मार्गेवाडी वळणावर सरपंच संजय पडवळ यांचे घर आहे. या घराला लागूनच त्यांची उसाची शेती आहे. या उसाच्या शेतात आज त्यांची आई अंबुबाई यांच्यासह अन्य चार ते पाच महिला भांगलण करत होत्या. दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव वेगात गगनबावड्याहून कोल्हापूरकडे जाणारी एक मोटार ( एमएच 12 एमएफ 0299 ) चालकाचे नियंत्रण सुटल्याने उसाच्या शेतात घुसली. शेतात काम करणाऱ्या अंबुबाई यांच्या अंगावरून मोटार गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुजाता शिंदे व सविता पडवळ या दोघी किरकोळ जखमी झाल्या आहेत.

अपघाताच्या मोठ्या आवाजाने नागरिक येथे जमा झाले. या गर्दीचा फायदा घेत मोटार तेथेच टाकून चालक पसार झाला. जमावाने अंबाबाई यांच्यासह जखमींना सीपीआर येथे हलवले. या अपघाताची माहिती समजताच आमदार चंद्रदीप नरके यांनी सीपीआरला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

Web Title: Old woman dead in an accident near Salvan in Kolhapur