Nipani : निपाणीतील ५३४ जणांचे मतदान कोणाच्या पथ्यावर? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

paschim maharshtra

निपाणीतील ५३४ जणांचे मतदान कोणाच्या पथ्यावर?

sakal_logo
By
अमोल नागराळे

निपाणी : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निपाणी तालुक्यातील राजकारण हळूहळू तापू लागले आहे. निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्था गटातून प्रतिनिधी विधान परिषदेवर निवडून जाणार असले तरी या निवडणुकीनिमित्त स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तालुक्यात ५३४ मतदार असून हे मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार? याची उत्सुकता मतदार संघाला लागून आहे.

भाजपकडून महांतेश कवटगमीठ, काँग्रेसकडून चन्नराज हट्टीहोळी तर अपक्ष म्हणून लखन जारकीहोळी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे लढत चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत. निपाणी विधानसभा मतदार संघ कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर असून राजकीय दृष्ट्या नेहमी महत्वाचा व चर्चेतील मतदार संघ म्हणून याकडे पाहिले जाते. तालुक्यात भाजप व काँग्रेस दोन्ही गट तुल्यबळ आहेत. विधानपरिषद निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी सध्या स्थानिक पातळीवर राजकीय हालचाली वेगावल्या आहेत. प्रचाराच्या निमित्ताने उमेदवारांसह स्थानिक नेते, कार्यकर्त्यांनी मतदारांशी संपर्क वाढविला आहे.

बुधवारी (ता. २४) भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ यांची आडी मल्लय्या डोंगरावर तर काँग्रेस उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांची निपाणीत प्रचार सभा पार पडली आहे. प्रचारसभेच्या निमित्ताने दोन्ही पक्षाच्या मतदार व कार्यकर्त्यांनी गर्दी खेचण्याचा प्रयत्न केला. तालुक्यात भाजपकडून मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले व कार्यकर्ते यशस्वी मोर्चेबांधणीसाठी कामाला लागले आहेत. तर काँग्रेसकडून माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी, लक्ष्मण चिंगळे हे जास्तीतजास्त मतदार काँग्रेसकडे खेचण्यासाठी व्यूव्हरचना आखत आहेत.

युवा नेते उत्तम पाटील व अभिनंदन पाटील यांनी अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांचा अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांसह हजेरी लावली होती. त्यामुळे उत्तम पाटील हे लखन जारकीहोळी यांच्या विजयासाठी प्रय़त्न करणार हे स्पष्ट आहे. निवडणूक विधान परिषदेची असली तरी ती आगामी तालुका व जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची ठरणार आहे. या निवडणुकीनिमित्त स्थानिक नेत्यांची दमछाक होणार असून त्यांचे कामगिरी अधोरेखीत होणार आहे.

loading image
go to top