वडझिरे गोळीबारातील मुख्य आरोपीस पालघरमधून अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

वडझिरे येथे 17 फेब्रुवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास आरोपी साबळे याने गावठी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून सविता सुनील गायकवाड (वय 35) यांचा खून केला. तेव्हापासून तो पसार होता. 

पारनेर ः वडझिरे येथे गावठी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून सविता गायकवाड यांचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीस किरवली (जि. पालघर) येथून अटक केली. राहुल साबळे (रा. रांधे, ता. पारनेर), असे त्याचे नाव आहे. 

वडझिरे येथे 17 फेब्रुवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास आरोपी साबळे याने गावठी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून सविता सुनील गायकवाड (वय 35) यांचा खून केला. तेव्हापासून तो पसार होता. किरवली (जि. पालघर) येथे आरोपी साबळे लपल्याची माहिती पारनेर पोलिसांना मिळाली. त्यानुसार काल (बुधवारी) पहाटे पाच वाजता पोलिसांनी त्याच्या घराजवळ सापळा रचला.

सकाळी सहाच्या सुमारास घराबाहेर पडताच, पोलिसांनी झडप घालून त्यास ताब्यात घेतले. आरोपी साबळे तेथे एका जेसीबीवर ड्रायव्हर म्हणून काम करीत होता.

आरोपी राहुलचा मित्र सुरेश मापारी (रा. लोणी मावळा) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 25 फेब्रुवारीला अटक केली होती. 

आरोपीने गायकवाड यांच्या घरात जाऊन वाद घातला होता. त्याच्यासोबत त्याचा मित्रही होता. संबंधित मित्रावर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. त्याचाही राग साबळे याला होता. आरोपीने गोळ्या झाडल्या तेव्हा सविता यांची मुलगी तेथेच होती. तिने हा सगळा प्रकार पाहिला असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One arrested for firing