मतिमंद विवाहितेवर वेळोवेळी बलात्कार; अल्पवयीन मुलासह युवक ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

पोलिसांनी पीडितेकडे चौकशी केली असता गावातील काही जणांनी तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचे सांगितले. मात्र, संशयितांना ओळखण्यास ती असमर्थ होती.

नागठाणे : परिसरातील एका मतिमंद विवाहित महिलेवर वेळोवेळी बलात्कार करून गर्भधारणेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी अल्पवयीन मुलासह अन्य एका युवकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संदीप ऊर्फ संतोष हणमंत निकम (वय 29) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर कोणताही पुरावा नसताना काही तासातच संशयितांना पकडण्यात बोरगाव पोलिसांसह शाहूपुरी पोलिस, सातारा निर्भया पथक, महिला विशेष शाखा व सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या संयुक्त प्रयत्नाला यश आले. पीडित विवाहित महिला मतिमंद असून ती गेल्या पाच वर्षांपासून पती व मुलीपासून विभक्त आहे. ती आपल्या आजोळी वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी पीडितेच्या नातलगाला ती गर्भवती असल्याचा संशय आल्यामुळे त्यांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. यावेळी ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नातेवाईकांनी या घटनेची फिर्याद बोरगाव पोलिस ठाण्यात दाखल केली होती. 
पोलिसांनी पीडितेकडे चौकशी केली असता गावातील काही जणांनी तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचे सांगितले. मात्र, संशयितांना ओळखण्यास ती असमर्थ होती. घटनेचे गांभीर्य ओळखून बोरगाव पोलिस, शाहूपुरी पोलिस, सातारा निर्भया पथक व सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने दिवसभर वेशांतर करून संबंधित गावात चौकशी केली. त्यांच्या या तपासाला यश येत पोलिसांनी संतोष निकम व अन्य एक अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगावचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी, निर्भया पथकाच्या सहायक पोलिस निरीक्षक माधुरी जाधव, सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांच्यासह बोरगाव पोलिस, निर्भया पथक, शाहूपुरी व तालुका पोलिस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

आश्रमशाळेच्या शिपायावर विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल 

कऱ्हाड ः अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आश्रमशाळेच्या शिपायावर गुन्हा दाखल झाला. बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत शिपाई अरुण एकनाथ दळवी याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली.
 
पोलिसांची माहिती अशी ः सांगली जिल्ह्यातील एक अल्पवयीन मुलगी तालुक्‍यातील आश्रमशाळेत शिक्षण घेते. काही दिवसांपूर्वी ती मुलगी शाळेच्या कार्यालयात कुटुंबीयांना फोन करण्यासाठी गेली होती. त्या वेळी आश्रमशाळेतील शिपायाने तिची छेड काढत तिचा विनयभंग केला. अल्पवयीन मुलीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी निर्भया पथकाला त्या प्रकरणात तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार निर्भया पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक दीपज्योती पाटील, अतुल देशमुख यांनी तपास करत शिपायाला पकडण्यासाठी त्याच्या घरी छापा टाकला. गुरुवारी रात्री त्याला ताब्यात घेण्यात आले असून, याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : मुलांना अश्‍लिल चित्रफित दाखविल्याने;केंब्रिजचे कर्मचारी ताब्यात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Suspected Arrested In Nagthane Rape Case