विद्यार्थ्यांचा खर्च वाढणार ; बसपाससाठी आता ऑनलाईन नोंदणी सक्‍तीची

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 November 2020

अर्जाची पद्धत जुनीच असली तरी त्यात ऑनलाईनची एक नवी अट समाविष्ट करण्यात आली आहे.

बेळगाव : परिवहनकडून दिल्या जाणाऱ्या बस पासची नोंदणी आता ऑनलाईन करावी लागणार आहे. सेवासिंधू संकेतस्थळावरुन ही नोंदणी करावी लागणार असून त्यासाठी कर्नाटक वन किंवा सीएससी ऑनलाईन सेवा केंद्रातून अर्ज करावे लागतील. ही नोंदणी सशुल्क असल्याने बसपास मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक खर्च येणार आहे. अर्जाची पद्धत जुनीच असली तरी त्यात ऑनलाईनची एक नवी अट समाविष्ट करण्यात आली आहे.

बसपास वितरण 10 डिसेंबरपासून होणार आहे. त्यासाठी आधी जुन्या पद्धतीनुसार बसपासचा अर्ज भरावा लागणार आहे. बसपासच्या अर्जासोबत महाविद्यालयीन प्रवेश शुल्क पावती, स्वतःचा रंगीत फोटो, आधारकार्डची झेरॉक्‍स प्रत जोडावी लागणार आहे. ही सर्व कागदपत्रे जोडल्यानंतर शुल्कासहीत हा अर्ज महाविद्यालयात जमा करावा लागणार आहे. महाविद्यालयातून हे अर्ज परिवहनच्या पास वितरण केंद्रात पोचतील. केंद्रात बसपास तयार करुन नंतर ते वितरणासाठी महाविद्यालयाला पाठविले जाणार आहेत. 

हेही वाचा - गरज असेल तिथे मी उभा राहीन, मी तुमचाच आहे ; आमदारांनी दिला जनतेला शब्द -

मागील पाच वर्षापासून हीच पद्धत अवलंबिली जात आहे. पण, यंदा त्यात ऑनलाईन नाव नोंदणीची एक अट वाढविण्यात आली. विद्यार्थ्यांना जुन्या पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी आपल्या नजीकच्या सीएससी ऑनलाईन सेवा केंद्रात किंवा कर्नाटक वनला भेट द्यावी लागेल. तेथे सेवासिंधू संकेतस्थळावर सीएससी केंद्रचालक बसपाससाठी विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंद करतील. तशी नोंद झाल्यानंतर विद्यार्थ्याला अर्ज केल्याबाबतची एक प्रत दिली जाईल. 

जुन्या पद्धतीप्रमाणेच अर्ज भरल्यानंतर त्यासोबत ही प्रत जोडून अर्ज महाविद्यालयात जमा करावा लागेल. ही अतिरीक्त अट सध्या त्रासदायक ठरण्याची शक्‍यता आहे. सीएससी केंद्रावर ऑनलाईन अर्ज करताना ते सशुल्क असल्याने विद्यार्थ्यांना त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. अद्याप त्याचा दर निश्‍चित झाला नसला तरी सीएसी केंद्रचालकांडून 10 ते 50 रुपये आकारणी केली जाऊ शकते.

विद्यार्थ्यांना भुर्दंड

सेवासिंधूवरून ऑनलाईन अर्ज करताना आपल्या मोबाईलवरुन हे अर्ज भरण्याची विद्यार्थ्यांना संधी दिली असती तर त्यासाठी केवळ मोबाईल डाटाचा वापर झाला असता. सीएससी केंद्र शोधत फिरण्याची वेळही विद्यार्थ्यांवर आली नसती. पण, सीएससीवरुनच अर्ज करण्याची अट विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाया घालविणारी ठरणार आहे.

हेही वाचा -  इंधन निर्मितीसाठी आता नवा फंडा -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online bus pass registration is compulsory this condition the cost increase of students in belgaum