ऑनलाईन एज्युकेशन : शिक्षण राहिले बाजूला, मुलांवर होतोय हा परिणाम

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

कोविड आपत्तीने लागू झालेल्या सक्तीच्या टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन एज्युकेशनचा जोश आता पुरता विरला आहे. आता फक्त त्याचा दिखाव्यासाठीचा सोसच उरला आहे.

सांगली ः कोविड आपत्तीने लागू झालेल्या सक्तीच्या टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन एज्युकेशनचा जोश आता पुरता विरला आहे. आता फक्त त्याचा दिखाव्यासाठीचा सोसच उरला आहे. या प्रयत्नांचा उपयोग किती झाला याचे निष्कर्ष पुढे आलेले नाहीत मात्र त्याचे दुष्परिणाम मात्र पुढे येत असून मुले मोबाईल ऍडीक्‍ट होत असल्याचे धक्कादायक निरीक्षणे आहेत. 

कोविड आपत्तीनंतर सगळ्यात आधी शाळांना टाळे लागले. परीक्षा रद्द झाल्या. त्यानंतर उन्हाळी सुटीत मुलांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न शिक्षक-संस्थांनी केला. झूम ऍपसारख्या माध्यमातून अध्यापनाला खूपच मर्यादा आल्याचे स्पष्ट झाले. शिवाय अनंत तांत्रिक अडचणी. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात केवळ यू ट्यूब लिंक देण्यात येऊ लागल्या. मात्र त्याच्याही मर्यादा स्पष्ट झाल्या. हा एकतर्फी संवाद ठरला. वरून चावी सुरू केली मात्र पाणी कुठे गेले याचा पत्ता नाही अशी स्थिती आहे. मुलांना नेमके किती आकलन झाले. होतेय किंवा नाही याचे कोणतेही निष्कर्ष नाहीत. 

एकीकडे ही स्थिती असताना अशा शिक्षणासाठी असणारी साधन-सामुग्री त्यासाठीच्या खर्चाची ऐपत असे अनेक मुद्दे पुढे आले. सुरवातीच्या टप्प्यात मुलांनी पालकांचे मोबाईल वापरले. मात्र टाळेबंदी शिथिल होताच या प्रयत्नांचांही खेळखंडोबा झाला. सकाळी आणि रात्री मुलांकडेच मोबाईल अडकला. मुलगा नेमके काय शिकतोय सुरवातीला पाहणारे पालक नंतर कंटाळले आणि त्यांनी दुर्लक्ष करताच मुले मनोरंजनाच्या मोहात अडकले. मोबाईल गेम्स, फिल्म्स पाहण्याचे प्रकार सुरू झाले. मोबाईलमध्ये मुलांचे हे अडकणे पालकांसाठी मोठे डोकेदुखी ठरली. 

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 1 जूनपासून शाळा नसली तरी शालेय वर्ष सुरू राहील असे जाहीर करून टाकले. त्यानंतर शाळा कशा सुरू करायच्या याचे ठराव संस्थाचालकांकडून करून पाठवा असे फर्मान शिक्षण विभागाकडून निघाले. मात्र शाळा कशा सुरू करायच्या याच्या नेमक्‍या गाईडलाईन मात्र शासनाने दिल्या नाहीत. हा प्रकार तुम्हीच शाळा सुरू करायची आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी घ्या असा प्रकार होता. त्याचेही शिक्षण वर्तुळात तीव्र पडसाद उमटले. 

आजघडीला तरी ऑनलाईन एज्युकेशन ठराविक वर्गापुरतेच शक्‍य आहे. खेड्यापाड्यात मोबाईल, इंटरनेटपासूनच अडचणींचा मोठा पाढा आहे. मात्र मुलांच्या भवितव्याच्या भीतीपोटी टाळेबंदीनंतर ऍड्राईड मोबाईलची खरेदी कैक पटीने वाढली आहे. अज्ञान, दारिद्य्र, भय यांसह अनेक प्रश्‍नांनी ग्रासलेल्या पालकांवर हे भलतेच मोठे संकट ओढवले आहे. 

सर्व्हे काय सांगतात? 
राज्यात 28 एप्रिलपासून "शाळा बंद...पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम, दीक्षा ऍप, सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रम, मिस कॉल करा आणि गोष्ट अशा साधनांच्या माध्यमातून घरी राहून शिकण्याचे काम सुरू झाले. या प्रयत्नांचे काय झाले याचा अभ्यास युनीसेफ आणि एससीईआरटीने सर्व्हे केला. त्यासाठी 36 जिल्ह्यांतील 74 तालुक्‍यांची निवड केली. ते निवडताना सर्वात जास्त आणि कमी साक्षरता दर असणारे असे प्रत्येकी दोन तालुके निवडले. प्रत्येक तालुक्‍यातील दहा शाळांमधील प्रत्येकी 10 ते 15 विद्यार्थ्यांचा अभ्यास केला. त्यातून आलेले निष्कर्ष असे की या सर्व्हेतून एकच मोबाईल क्रमांक वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांकडे असणे, शेजाऱ्यांचे मोबाईल क्रमांक असणे, संपर्कच न होणे असे अनेक प्रकार आढळले. सांगली जिल्ह्यात दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची सुमारे अडीच लाख संख्या आहे. अशा सर्वच विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमार्फत ऑनलाईन एज्युकेशनचा प्रयत्न म्हणून प्रत्येक वर्गशिक्षकाला अभ्यासक्रमाच्या लिंक पाठवल्या जात आहेत. त्या शिक्षकाने आपआपल्या विद्यार्थ्यांकडे त्या पाठवाव्यात आणि विद्यार्थ्यांनीच स्वंयमूल्यांकन करावे असे ठरले आहे. त्यामुळे नेमके किती विद्यार्थी त्याचा जिल्ह्यात लाभ घेत आहेत आणि त्याचे फलित काय याबद्दल आज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडे कोणतेही निष्कर्ष-माहिती नाही. मात्र प्रारंभीच्या एका आकडेवारीनुसार सुमारे पंचवीस ते तीस टक्के विद्यार्थ्यांकडे ऍड्रॉईड मोबाईलची-इंटरनेटची सुविधा आहे. 

मोबाईल अतिरिक्त वापर घातक

कोवळ्या वयात मोबाईलच्या अतिरिक्त वापर घातक आहे. भविष्यात मेंदू, कान या इतर अवयवावरही दुष्परिणाम संभवतात. त्याचा धोका ओळखून शासनाने निर्णय घ्यावेत. 
- डॉ. सुहास जोशी, नेत्ररोगतज्ज्ञ 

असे शिक्षण पूरक साधन
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीच आम्ही अभ्यासक्रमाचे छोटे छोटे व्हिडिओ शिक्षकांकडून करून मुलांना दिले. त्याचा मुलांना किती लाभ झाला हे सांगता येणार नाही. पालक आणि शासन शाळा सुरू करण्याचा नाहक अट्टाहास करीत आहे. दोन महिन्याच्या अनुभव असे सांगतो की असे शिक्षण अशक्‍य आहे. ते पूरक साधन ठरू शकते शाळांना पर्याय नाही. 
- जनार्दन लिमये, उपाध्यक्ष, सांगली शिक्षण संस्था 

मूल्यमापन ऑनलाईन कसे करणार?
नाईलाज म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आला. मात्र त्यावर विसंबून राहता येणार नाही. मूल्यमापन ऑनलाईन कसे करणार? पुस्तकापलीकडचा संवाद ऑनलाईन कसा करणार? शिस्त, वक्‍तशीरपणा अशा अनेक मूल्यांचे अध्यापन ऑनलाईन कसे करणार? 
- विनोद पाटील, प्राथमिक शिक्षक, आगळगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Education... children being addicted to mobile