
कोरोनाचे संकट संपेपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणावरच अवलंबुन रहावे लागण्याची शक्यता आहे.
बेळगाव : ऑनलाईन शिक्षणाचा विद्यार्थ्यांना लाभ होण्याऐवजी विद्यार्थी ऑनलाईन खेळांकडे वळत असल्याची तक्रार पालकांकडून मोठ्या प्रमाणात होत असली तरी ऑनलाईन शिक्षण बंद केले जाणार नाही असे शिक्षण खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट संपेपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणावरच अवलंबुन रहावे लागण्याची शक्यता आहे.
शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास अनेक दिवसांचा विलंब झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काही शाळांकडुन ऑनलाईन शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. मात्र ऑनलाईन शिक्षणाबाबत पालकांमधुन उलट सुलट चर्चा ऐकायला मिळत आहे. तसेच काही पालकांकडुन ऑनलाईन शिक्षणाचे स्वागत केले जात आहे. तर काही पालक ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी अभ्यासाऐवजी खेळांकडे वळत आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण नको अशी भुमिका पालकांकडुन घेतली जात आहे. तसेच याबाबत काही जणांनी शिक्षण खात्याकडे तक्रार केली आहे.
हेही वाचा - देशाला दिशा देण्यासाठी भाजपला गावागावांत पोचवा : राणे -
मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमिवर शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळा सुरु होइपर्यंत ऑनलाईन शिक्षण बंद केले जाणार नाही, अशी माहिती शिक्षण खात्याने दिली आहे. त्यामुळे शाळा सुरु होईतोपर्यंत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणावरच भर देणे आवश्यक बनले आहे. शहरातील विना अनुदानित व अनुदानित शाळांमधुन ऑनलाईन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना दिला जात असला तरी सरकारी शाळांमधील विद्यागम योजना स्थगीत असल्यामुळे विद्यार्थी अभ्यासापासुन दुर आहेत. त्यामुळे सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी उपाय योजना हाती घेणे आवश्यक असल्याचे मत पालकांमधुन व्यक्त होत आहे. खाजगी शाळांमधील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणामुळे अभ्यासात गुंतलेले असताना सरकारी शाळांमधील विद्यार्थी मात्र अभ्यासाऐवजी इतर कामात गुंतले आहेत.
"शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण दिले जात असुन पालकांनी विद्यार्थ्यांना आवश्यक वेळीच मोबाईल त्यांच्या हातात घ्यावा. तसेच मोबाईलचा वापर चांगल्या कारणांसाठीच करावा अशी सुचना करणे आवश्यक असुन ऑनलाईन अभ्यासक्रम सध्या गरजेचा बनला आहे."
- अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी
"मुलांकडे ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल दिल्यानंतर ते काय करीत आहेत याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा मुले अभ्यासाऐवजी खेळाकडे वळतात असे दिसुन आले आहे. सध्या शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईन अभ्यास शिवाय पर्याय नसला तरी मुलांकडुन मोबाईलचा मोठ्या प्रमाणात होणारा वापर धोकादायक आहे."
- धनंजय पाटील, पालक
हेही वाचा - उपचाराला जात असताना दोघांना वाटेतच गाठले मृत्यूने -
संपादन - स्नेहल कदम