ऑनलाईन महासभा बुधवारपर्यंत तहकूब : सभेत भानगडीचे विषय घेतले जात असल्याचा आरोप...ऑफलाईन सभेचा सदस्यांचा आग्रह 

बलराज पवार
Thursday, 17 December 2020

सांगली-  ऑनलाईन सभेत तांत्रिक अडचणी येतात त्यामुळे सदस्यांना बोलता येत नाही. शिवाय या सभेत भानगडीचे विषय घेतले जात असल्याचा आरोप होत असल्याने सदस्यांची बदनामी होत आहे. त्यामुळे ऑनलाईन सभा तहकूब करून पुढची सभा ऑफलाईन घ्यावी अशी सर्वपक्षीय मागणी करण्यात आली. महापौर गीता सुतार यांनी 23 डिसेंबरपर्यंत महासभा तहकूब करत असल्याची घोषणा केली. तोपर्यंत शासनाकडून ऑफलाइॅन सभा घेण्याबाबतचे आदेश न आल्यास पुन्हा ऑनलाईन सभाच घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. 

सांगली-  ऑनलाईन सभेत तांत्रिक अडचणी येतात त्यामुळे सदस्यांना बोलता येत नाही. शिवाय या सभेत भानगडीचे विषय घेतले जात असल्याचा आरोप होत असल्याने सदस्यांची बदनामी होत आहे. त्यामुळे ऑनलाईन सभा तहकूब करून पुढची सभा ऑफलाईन घ्यावी अशी सर्वपक्षीय मागणी करण्यात आली. महापौर गीता सुतार यांनी 23 डिसेंबरपर्यंत महासभा तहकूब करत असल्याची घोषणा केली. तोपर्यंत शासनाकडून ऑफलाइॅन सभा घेण्याबाबतचे आदेश न आल्यास पुन्हा ऑनलाईन सभाच घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. 

महापौर गीता सुतार यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची आज ऑनलाईन महासभा बोलवण्यात आली होती. गेले काही महिने कोरोनामुळे शासन आदेशानुसार ऑनलाईन महासभा होत आहे. मात्र त्यामध्ये उपसुचनेद्वारे बंद जकात नाक्‍याच्या जागा भाडयाने देण्यासारखे विषय घुसडण्यात आल्याचे आरोप झाले. या महासभेत आरक्षित भुखंडावरील आरक्षण उठवणे, नाममात्र दराने मोक्‍याचा भूखंड भाड्याने देणे असे विषय होते. त्यामुळे ही सभा वादात सापडली होती. कॉंग्रेससह सामाजिक संघटनांनी या विषयांना विरोध केला. सर्वपक्षीय कृती समितीने ऑनलाईन सभा घेण्यास व भूखंडाचा बाजार करण्यास विरोध केला. 
सर्व पक्षीय सदस्यही ऑनलाईन महासभा घेण्यावर नाराज होते. ऑफलाईन सभेत सर्वच विषयांवर चर्चा करून निर्णय घेतले जातात. पण ऑनलाईन सभेत सदस्यांना बोलता येत नाही. याचा गैरफायदा घेत बेकायदेशीर विषय घुसडले जात असल्याचा आरोपही करण्यात आला. त्यामुळे आजच्या ऑनलाईन महासभेकडे लक्ष होते. 

महासभेत प्रारंभी दुखवट्याचे व अभिनंदनाचे ठराव झाल्यानंतर मात्र सभा तहकुब करण्याची मागणी झाली. विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, संतोष पाटील, वहिदा नायकवडी, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी ऑनलाईन महासभा तहकूब करण्याची मागणी केली. संतोष पाटील म्हणाले, दोन दिवसापुर्वी जिल्हा परिषदेला ऑफलाईन सभा घेण्याचे पत्र शासनाने दिले आहे. महापालिकेलेही ते लवकरच मिळेल. त्यामुळे ही सभा तहकुब करावी अशी मागणी केली. 
भानगडीचे आरोप फेटाळले.

भाजपचे नेते शेखर इनामदार यांनी ऑनलाईन सभेत भानगडी होत असल्याचा आरोप फेटाळला. भाजपने सत्तेत आल्यापासून कोणत्याही सभेत असे निर्णय घेतले नाही. ऑनलाईन सभेबाबत संशय असेल तर भाजपचा विरोध नाही ऑफलाइॅन सभा घेण्यास तयार आहे. ऍड. स्वाती शिंदे यांनी, ऑनलाईन सभेत भाजपने कोणतीही भानगड केली नाही, पण ऑफलाईन सभा झाली पाहिजे. शासन आदेश आल्यानंतर त्याचा निर्णय घेता येईल. पण ही ऑनलाईन सभा तहकूब करू नये. जो काही निर्णय असेल तो चर्चेने करता येईल, असे मत व्यक्त केले. 

आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न करावा 
राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यांच्या नेत्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून ऑफलाईन सभेचे आदेश आणावेत. शासनाच्या आदेशानुसारच ऑनलाईन सभा घेण्यात येत आहेत. शासनाने आदेश दिल्यास सभा सभागृहात घेण्यात येईल असे भाजपचे नेते शेखर इनामदार यांनी सांगीतले. 

 

सदस्यांच्या मागणीनुसार ऑनलाईन सभा तहकूब करण्यात आली. पुन्हा 23 डिसेंबर रोजी ही सभा होईल. दरम्यानच्या काळात शासनाकडून ऑफलाइन सभेबाबत पत्र यावे अशी अपेक्षा आहे. मात्र ते न आल्यास पुन्हा ऑनलाईन सभा घेणार. 
महापौर गीता सुतार 

...........
महासभेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा व्हावी. यादृष्टीने आजची सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. या आधीही महासभेत सदस्यांना चर्चेला पुरेसा वेळ दिला आहे. आम्ही पारदर्शक कारभाराचा शब्द दिला आहे. त्यासाठी कटीबध्द आहे. ऑफलाईन महासभेचा निर्णय शासनस्तरावर प्रलंबित आहे. 
शेखर इनामदार, महापालिका नेते, भाजप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online General Assembly scheduled for Wednesday