गोंधळामुळे इस्लामपूर पालिकेची ऑनलाईन सभा तहकूब 

धर्मवीर पाटील
Saturday, 10 October 2020

ऑनलाइन सभेत तांत्रिक कारणांमुळे निर्माण झालेल्या गोंधळामुळे आजची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली.

इस्लामपूर : ऑनलाइन सभेत तांत्रिक कारणांमुळे निर्माण झालेल्या गोंधळामुळे आजची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. दरम्यान मागील सभेचे कार्यवृत्त, निर्णयांची दाखल घेण्याच्या विषयावर झालेल्या चर्चेत घरकुल बांधकाम, वाटप आणि त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीवरून गोंधळ झाला. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, शकील सय्यद तसेच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीदेखील आक्षेप नोंदवले. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुमारे सहा महिन्यांनी ही बैठक झाली. 

नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेचे आयोजन केले होते. प्रारंभीपासूनच आवाज येत नाही, बोललेले समजत नाही, बैठक नंतर घ्या अशा सूचना येत होत्या. तरीही विषयपत्रिकेतील पहिल्या तीन विषयांचे वाचन झाले. यातील जुन्या काही निर्णयांच्या विषयावर आनंदराव पवार, शकील सय्यद यांनी आक्षेप घेतले. 

घरकुल योजनेअंतर्गत करण्यात आलेले वाटप, त्यासाठी राबविण्यात आलेली प्रक्रिया, त्यासाठी पानवळकर नावाच्या व्यक्तीची केलेली नेमणूक याबाबत जाब विचारण्यात आला. नगराध्यक्षांनी हा विषय साडे तीन वर्षांपूर्वीचा असून त्यावर स्वतंत्रपणे बैठक आयोजित करू असे सांगितले मात्र तरीही शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी प्रश्न उपस्थितच केले. संबंधित व्यक्ती कोणत्या पदावर आहे? त्याला पगार आहे का? त्याला काय अधिकार आहेत? कुणी नेमले? त्याची जबाबदारी काय? अशी सरबत्ती सय्यद यांनी केली. हा माणूस नागरिकांशी उद्धटपणे बोलत असल्याचा आरोप आनंदराव पवारांनी केला. विश्वनाथ डांगे, शहाजी पाटील, उपनगराध्यक्ष दादासो पाटील यांनी त्याला दुजोरा दिला. 

दरम्यान आवाज येत नसल्याच्या तांत्रिक तक्रारी सुरूच होत्या. बहुतांशजणांनी ही बैठक सुरक्षितरीत्या आणि एक हजार क्षमता असलेल्या नाट्यगृहात आयोजित करण्याची सूचना केली. ती डावलून शासनाचे आदेश रेटण्याचा प्रयत्न मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी केला. त्यावर वैभव पवार, अमित ओसवाल यांनी 'पालकमंत्री उघडपणे आढावा बैठक घेतात, सभा, कार्यक्रम घेतात, त्यांना शासनाचा आदेश आडवा येत नाही मग या सभेलाच का? शासनाचे अधिवेशन होते, मग ही सभा का नाही?' असे प्रश्न उपस्थित केले. शेवटी नाईलाजास्तव जिल्हाधिकारी, नगररचना विभाग यांच्याकडे विनंती करून पुढच्या आठवड्यात ही बैठक आयोजित केली जाईल, असे सांगून ही सभा तहकूब करण्यात आली. 

पोटभाडेकरू विषय पुन्हा ऐरणीवर! 
शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत बांधलेली घरे तसेच व्यावसायिक गाळे यामधील पोटभाडेकरू यांचा विषय आज पुन्हा ऐरणीवर आला; मात्र पुढच्या बैठकीत केलेल्या सर्वेच्या आधारावर चर्चा करण्याचे आश्वासन निशिकांत पाटील यांनी दिले.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online meeting of Islampur Municipality scheduled due to confusion