केवळ अठरा महाविद्यालयांत शारीरिक शिक्षण विषय ऐच्छिक

- संदीप खांडेकर
बुधवार, 1 मार्च 2017

पदवी स्तरावर शारीरिक शिक्षण विषय महत्त्वाचा असला, तरी शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील केवळ १८ महाविद्यालयांत शारीरिक शिक्षण हा विषय ऐच्छिक म्हणून घेण्याची सोय आहे. महाविद्यालयांतील अन्य विषय संख्येच्या तुलनेत शारीरिक शिक्षणविषयक शिक्षकांची संख्याही कमी आहे. क्रीडाविषयक सोयी-सुविधांचा प्रश्‍नही गांभीर्याने विचार करायला लावणारा आहे. शारीरिक शिक्षण विषय हा सक्तीचा केला तर खेळाडूंच्या भविष्याचे चित्र बदलू शकते. त्या अनुषंगाने शारीरिक शिक्षण विषयावर टाकलेला हा प्रकाशझोत...

पदवी स्तरावर शारीरिक शिक्षण विषय महत्त्वाचा असला, तरी शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील केवळ १८ महाविद्यालयांत शारीरिक शिक्षण हा विषय ऐच्छिक म्हणून घेण्याची सोय आहे. महाविद्यालयांतील अन्य विषय संख्येच्या तुलनेत शारीरिक शिक्षणविषयक शिक्षकांची संख्याही कमी आहे. क्रीडाविषयक सोयी-सुविधांचा प्रश्‍नही गांभीर्याने विचार करायला लावणारा आहे. शारीरिक शिक्षण विषय हा सक्तीचा केला तर खेळाडूंच्या भविष्याचे चित्र बदलू शकते. त्या अनुषंगाने शारीरिक शिक्षण विषयावर टाकलेला हा प्रकाशझोत...

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील १८ महाविद्यालयांत बीए भाग-१ ते बीए भाग-३ मध्ये शारीरिक शिक्षण विषय ऐच्छिक म्हणून शिकविला जातो. क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंचे योगदान वाढविणाऱ्या शारीरिक शिक्षण विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. त्यातही हा विषय ऐच्छिक म्हणून शिकविणाऱ्या महाविद्यालयांच्या तुलनेत आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी करणारी महाविद्यालये वरचढ ठरताना दिसतात. याचा तपशीलवार अभ्यास केल्यास एकूणच शारीरिक शिक्षण विषय सक्‍तीचा करण्यासाठी गांभीर्याने विचार करण्याची वेळ येऊन ठेपल्याचे चित्र आहे.  

बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पदवी स्तरावरील तीन वर्षांचा विद्यार्थ्यांचा प्रवास सुरू होतो. खेळाडू म्हणून कामगिरी करणाऱ्यांना तीन वर्षांत पदकांची लयलूट करण्याची तयारी सुरू होते; मात्र पदवी स्तरावर खेळाडूंचा टक्काही कमी होत असल्याचा तज्ज्ञांचा सूर ऐकायला मिळतो. शारीरिक शिक्षण विषय घेऊन करिअरची वाट सोपी करण्यासाठी खेळाडूंचा प्रयत्न सुरू होतो. महाविद्यालयात क्रीडा सुविधा उपलब्ध असतील, तर खेळाडूंचा मार्ग सुलभ होतो. अन्यथा अथक परिश्रमाने त्यांना त्यांचे कर्तृत्व सिद्ध करावे लागते. नेमकी तशी स्थिती महाविद्यालयांतील खेळाडूंच्या खेळातील प्रवासाकडे पाहिल्यास समजून येते. 

शारीरिक शिक्षण हा महत्त्वाचा विषय असल्याने पदवी स्तरावर या खेळाची स्थिती काय, याबाबत प्रा. डॉ. पी. टी. गायकवाड यांनी नुकताच अभ्यास केला. पदवी स्तरावर शारीरिक शिक्षण हा विषय ऐच्छिक असणाऱ्या महाविद्यालयांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान या विषयावर त्यांनी चिकित्सक अभ्यास करत शोधप्रबंध सादर केला. एक खेळाडू म्हणून त्यांनी केलेला हा अभ्यास शारीरिक शिक्षणाचे वास्तव मांडून या विषयासाठी नेमकेपणाने काय करायला हवे, याचाही उहापोह केला आहे. 

विद्यापीठ कार्यक्षेत्रात पदवी स्तरावरील अठरा महाविद्यालयांपैकी फक्‍त आठ महाविद्यालयांमध्येच प्रथम वर्षापासून ते तृतीय वर्षापर्यंतचे आठ पेपर शिकविण्याची सोय आहे. उर्वरित दहा महाविद्यालयांत फक्‍त प्रथम व द्वितीय वर्षातील तीनच पेपर शिकविले जातात. शारीरिक शिक्षण विषयाच्या तुलनात्मक अभ्यासासाठी निश्‍चित केलेल्या बत्तीस पैकी केवळ तीन महाविद्यालयांत मैदानविषयक समाधानकारक अशी स्थिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पाच, सांगलीतील नऊ, तर सातारा जिल्ह्यातील चार महाविद्यालयांत शारीरिक शिक्षण अभ्यासला जात असला, तरी केवळ आठ महाविद्यालयांत तो चांगल्या पद्धतीने शिकविण्यात येतो. (क्रमश:)

- शारीरिक शिक्षण हा ऐच्छिक म्हणून शिकविला जातो. 
- बीए भाग-१ ते बीए भाग -३ करिता ११०० गुणांची परीक्षा घेतली जाते. 
- पुणे, अमरावती, औरंगाबाद, नांदेडमधील विद्यापीठांव्यतिरिक्‍त अन्यत्र कोठेही पदवी स्तरावरील सर्व तीनही वर्षांत शारीरिक शिक्षण हा विषय ऐच्छिक म्हणून घेण्याची सोय नाही. 

नागेशकर यांचा पुढाकार
क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर यांच्या पुढाकाराने विद्यापीठाच्या स्थापनेपासून शारीरिक शिक्षण विषय पदवी स्तरावरील प्रथम वर्षांतील विद्यार्थ्यांसाठी सक्‍तीचा करण्यात आला व त्यासाठी दहा गुणांची शारीरिक शिक्षण परीक्षा अनिवार्य करण्यात आली. ती परीक्षा आजही घेतली जाते. 

Web Title: Only eighteen colleges physical education elective subject