Only four rotations from the Godavari canal this year
Only four rotations from the Godavari canal this year

गोदावरीच्या चारच आवर्तनांवर बोळवण

शिर्डी : नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणे व मराठवाड्यातील जायकवाडी धरण काठोकाठ भरलेले असतानाही गोदावरी कालव्यातून यंदा केवळ चार आवर्तने दिली जाणार आहेत. जलसंपदा अधिकाऱ्यांच्या भाषेत हे 'गुड इयर' आहे; तरीही लाभधारक शेतकऱ्यांना एक आवर्तन कमी देण्यात आले. मंत्रालयात नाशिकचे संपर्कमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत पाच आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिले आवर्तन येत्या 20 फेब्रुवारी रोजी सुटणार असून, त्यापुढील एप्रिल, मे व जून महिन्यात प्रत्येकी एक आवर्तन दिले जाईल.

पावसामुळे वितरिका व उपवितरिका गवतात हरवून गेल्या आहेत. आवर्तनापूर्वी त्या दुरुस्त केल्या जाणार असल्याचे सांगितले जाते. या बैठकीस आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार लहू कानडे व खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह जलसंपदाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव व कार्यकारी अभियंता सागर शिंदे, निवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ आदी उपस्थित होते.

सात आवर्तने दिल्याची नोंद

पाणीवाटप सल्लागार समितीच्या बैठका जिल्हास्तरावर घ्याव्यात, अशी मागणी आमदार काळे यांनी या बैठकीत केली. ती मान्य करण्यात आली. नाशिकमधील धरणातील पाणीसाठे लक्षात घेता यंदा पाच ते सहा आवर्तने देणे शक्‍य होते. यापूर्वी अशा सुगीच्या काळात सात आवर्तने दिल्याची नोंद आहे. गुड इयर असताना केवळ चार आवर्तने देण्यात आली. त्यामुळे भविष्यात काय वाढून ठेवले आहे, याची चिंता शेतकऱ्यांना सतावते आहे.

तथापि, येत्या जुलै महिन्यापर्यंत कालव्यातून दर महिन्याला पाणी वाहते राहणार आहे. विहिरींच्या पाण्याची पातळी वर आली आहे. त्यामुळे यंदा शेती व पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही. 

पालखेड डाव्या कालव्यातून कोपरगाव तालुक्‍यातील शिरसगाव, सावळगाव, तिळवणी, आपेगाव, गोधेगाव, घोयेगाव, भोजडे, कासली, पढेगाव, दहेगाव, अचलगाव, करंजी, अक्कडगाव व तळेगाव मळे या गावांना पाणी द्यावे, अशी मागणी आपण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली. 
- आशुतोष काळे, आमदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com