....तेव्हाच अस्पृश्‍यांनी घेतला पाण्याचा घोट !

....तेव्हाच अस्पृश्‍यांनी घेतला पाण्याचा घोट !

वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) ः 24 एप्रिल 1927 चा दिवस उजाडला. बाबासाहेब आले. मिरवणूक काढण्यात आली. रेशमाच्या दोरीला चांदीचा पेला बांधून डॉ. बाबासाहेबांच्या हस्ते विहिरीतील पाणी शेंदण्यात आले. बाबासाहेबांनी प्रथम पाणी प्राशन केले. तसेच औक्षण करणाऱ्या 12 वर्षांच्या शावाबाईला पहिल्यांदा पिण्यास दिले. त्या वेळी सर्वांनी एकच जयघोष केला. या अभिनव उद्‌घाटनानंतर सर्वांनी त्या विहिरीतील पाणी पिण्यास सुरुवात केली. 

श्रमदानातून झाली विहीर तयार 
स्पृश्‍य-अस्पृश्‍य भेदभाव टोकाला गेला होता. तोंडाला मडके आणि कंबरेला फडके, अशी अस्पृश्‍यांची अवस्था. पिण्याचे पाणी नाही. गावात शिरकाव नाही. तलाव, विहिरींना हात लावला तर विटाळ. यातून अमानुष मारहाण. कानात गरम शिसे ओतण्याच्या शिक्षेने अस्पृश्‍य सहसा पाण्याला हात लावत नव्हते. पाण्याअभावी मरणावस्था झाली. सोलापूर जिल्ह्यातील वळसंग. (सध्या तालुका दक्षिण सोलापूर) भेदभावामुळे गावातील अस्पृश्‍यांना सवर्ण लोक सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरू देत नव्हते. पाण्यासाठी या समाजाला कोसो दूर भटकंती करावी लागे. त्या वेळी गावातील अस्पृश्‍यांनी एकत्र येऊन रामा भिकू गायकवाड यांच्या पुढाकारात स्वतंत्र विहीर खोदण्याचे ठरविले. प्रत्येकाने श्रमदान करण्याचा निर्णय घेतला. खोदकामाला सुरुवात झाली. पाहता-पाहता विहीर तयार झाली. विहिरीला भरपूर पाणी लागले. समाज आनंदी झाला. प्रयत्न फळास आले. मात्र, समाजाने निश्‍चिय केला- बाबासाहेबांनी पाणी पिल्याशिवाय पाण्याचा घोट घ्यायचा नाही. पण, बाबासाहेबांना येथे आणायचे कसे? ते आपल्या गावात येतील का? यावर चर्चा झाली. पेच होता. 

बाबासाहेबांना दिले निमंत्रण 
सर्वानुमते सोलापूरच्या काही पुढाऱ्यांना घेऊन गावातील गायकवाड व सहकारी मुंबईला गेले. बाबासाहेबांना सविस्तर माहिती दिली. त्यांना उद्‌घाटनाचे निमंत्रण दिले. बाबासाहेबांनी 24 एप्रिल 1927 रोजी येण्याचे कबूल केले. 24 एप्रिल उजाडली. ते वळसंगला आले. सर्व समाजासाठी तो दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिण्याचा ठरला. वस्तीतील लोकांनी बाबासाहेबांचे जंगी स्वागत केले. माजी उपसभापती ऍड. संजय गायकवाड यांच्या आजी उस्नाव्वा रामा गायकवाड व शावाबाई गजधाने यांनी बाबासाहेबांना औक्षण केले. आचेगाव रोडवरून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. विहिरीतील पाण्याच्या उद्‌घाटनासाठी अभिनव पद्धत वापरली. रेशमाच्या दोरीला चांदीचा पेला बांधला. त्याद्वारे विहिरीचे पाणी काढले. विहिरीतील पाणी शेंदून प्रथम बाबासाहेबांनी प्राशन केले. तसेच औक्षण करणाऱ्या 12 वर्षांच्या शावाबाईला पहिल्यांदा पिण्यास दिले. त्या वेळी सर्वांनी एकच जयघोष केला. या अभिनव उद्‌घाटनानंतर सर्वांनी त्या विहिरीतील पाणी पिण्यास सुरुवात केली. या विहिरीचे पाणी आजतागायत पिण्यासाठी वापरले जात आहे. दुष्काळातही या विहिरीतील पाणी सर्वांना पिण्यासाठी उपलब्ध होते, हे विशेष. गावातील ग्रामपंचायतीत दलितांना स्थान मिळाल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य झालेले ऍड. गायकवाड यांनी 1991-92 मध्ये या ऐतिहासिक विहिरीच्या जतनासाठी व त्याचा इतिहास समजण्यासाठी फलक लावला. 

होटगीच्या पाटलासाठी वकीलपत्र 
होटगी (ता. दक्षिण सोलापूर) येथेही गावच्या पाटलावर आलेले गंडांतर डॉ. बाबासाहेबांच्या वकिलीच्या कर्तृत्वाने कसे टळले, याचा विशेष ठसा आहे. या गावातील शिवप्पा पुंडलिक पाटील यांच्या शेतात बेवारस मृतदेह आढळला. त्यावरून त्यांनीच हा खून केल्याची तक्रार नोंदविण्यात आली. त्यामुळे नसते बालंट येऊन त्यांना शिक्षा भोगावी लागली. त्याची कोर्ट केस सोलापूर न्यायालयात होती. आपल्या मुलावर अन्याय होत असल्याने शिवप्पाचे वडील पुंडलिक पाटील यांनी काही मित्रांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. आपण माझ्या मुलाची केस वकीलपत्र घेऊन चालवावी, अशी विनंती केली. डॉ. बाबासाहेबांनी होकार दिला. डॉ. बाबासाहेबांनी ही केस विजापूर कोर्टात वर्ग करून तेथे चालवली. यासाठी पुंडलिक पाटील यांनी सोलापुरातून रेल्वेची स्वतंत्र बोगी करून बाबासाहेबांना विजापूरला नेले. तेथे त्यांनी कोर्टात केस चालवून शिवप्पाची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली. ही आठवण तेव्हापासून होटगीतील पाटील परिवार हृदयात जपून आहे. बाबासाहेबांबद्दल एक वेगळाच आदरभाव पाटील परिवारात आजही जपला जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com