तीव्र लक्षणे असणाऱ्याच रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार करा 

विष्णू मोहिते 
Friday, 31 July 2020

कोविड रूग्णालयांमध्ये तीव्र लक्षणे आहेत, अशाच कोविड पॉझिटिव्ह रूग्णांना दाखल करून घेणे व त्यांच्यावर उपचार करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

सांगली : कोविड रूग्णालयांमध्ये तीव्र लक्षणे असलेल्या व ज्यांना रूग्णालयीन उपचाराची गरज आहे, अशाच कोविड पॉझिटिव्ह रूग्णांना दाखल करून घेणे व त्यांच्यावर उपचार करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार कोविड उपचारासाठी राखीव ठेवलेल्या रूग्णालयातील बेड्‌स लक्षणे असलेल्या व ज्यांना सक्रिय उपचाराची गरज आहे, अशाच कोविड पॉझिटिव्ह रूग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज दिल्या. 

कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, उपजिल्हाधिकारी विजय देशमुख, मिरज उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, सूचना विज्ञान अधिकारी यासिन पटेल उपस्थित होते. 

डॉ. चौधरी म्हणाले,""सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे नसलेल्या व ज्यांना सक्रिय वैद्यकीय उपचाराची गरज नाही, अशा रूग्णांना कोणत्याही परिस्थितीत कोविड रूग्णालयात दाखल करून घेऊ नये. तर अशा रूग्णांना कोविड केअर सेंटर किंवा त्यांच्या पसंतीनुसार पात्र असल्यास होम आयसोलेशनमध्ये ठेवावे.'' यावेळी त्यांनी फॅसिलिटी व बेड मॉनिटरिंग सिस्टीम विहीत कालावधीत अद्ययावत करणे बंधनकारक असून महापालिका आयुक्त व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी संबंधित यंत्रणांना याबाबत सूचना द्याव्यात, असे सांगितले. 

तज्ज्ञांमार्फत समुपदेशन करा... 
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले,""कोविड रूग्णांवर उपचार करण्यात येत असणारी शासकीय व अधिग्रहित करण्यात येणारी खासगी रूग्णालये ठिकाणचे रूग्ण तसेच कर्मचारी वृंद यांना मानसोपचार तज्ज्ञांमार्फत समुपदेशन करावे. तसेच अद्यापही कर्तव्यावर रूजू न झालेल्या खासगी वैद्यकीय व्यवसायिक व कर्मचारी यांना मेस्मा कायद्यांतर्गत नोटीस बजावाव्यात.'' 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only treat patients with severe symptoms