esakal | नाद करायचा नाय! फॉर्च्युनर गाडीतून वांग्याची विक्री, चर्चा तर होणारच

बोलून बातमी शोधा

नाद करायचा नाय! फॉर्च्युनर गाडीतून वांग्याची विक्री, चर्चा तर होणारच
नाद करायचा नाय! फॉर्च्युनर गाडीतून वांग्याची विक्री, चर्चा तर होणारच
sakal_logo
By
रवींद्र माने

तासगाव (सांगली) : शिरगावहून भर्रकन्‌ एक फॉरच्युनर येते... गाडी लोकांची परिचयाची असते... जिल्हा बॅंकेच्या संचालकाची असते... रुबाबदार गाडीतून दोन लोक खाली उतरतात. मागचा दरवाजा उघडतात. लोक बघत असतात, ती दोघं काय करताहेत... तो दोन कॅरेट खाली उतरवतात, दरवाजा बंद करतात आणि कॅरेटवरील कापड बाजूला करतात. दहा रुपयांना पावशेर आणि चाळीस रुपयांना किलो वांगी विकायला सुरवात करतात.

वाचून आश्‍चर्य वाटलं ना ! हे तासगावमध्ये घडतयं. ही गाडी आहे डॉ. प्रताप पाटील यांची. हे प्रताप पाटील जिल्हा बॅंकेचे संचालक आहेत. आधी ते आर. आर. आबांचे कट्टर समर्थक होते, पुन्हा संजयकाकांचे. जिल्हा बॅंकेत त्यांनी धक्कादायक निकाल नोंदवत संचालकपदावर उडी घेतली होती. त्यांचा रुबाब वेगळाच आहे. त्यांनी शिवारात दोन एकर सेंद्रिय वांगी केली आहेत. डॉक्‍टर हुशार आहेत, सेंद्रिय माल म्हटला की बडी लोकं उड्या मारत खरेदी करतात हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते तासगावात नव्हे तर पुण्यात वांगी विकण्यासाठी धडपड करत होते. गणित जमले होते, फड चांगलाच पिकला, मात्र पुण्याला जायचा रस्ताच बंद झाला. लॉकडाऊनने सारे अडचणीचे झाले. वांगी शिवारात ठेवून करायचे काय?

हेही वाचा: 'केंद्र सरकार राज्यातील यंत्रणांच्या कामात हस्तक्षेप करतंय'

डॉक्‍टरांनी वांगी तोडायला सांगितली आणि तासगावचा बाजार जवळ केला. या वांग्याच्या विक्रीतून होणारा फायदा तोटा हा विषय नाही, मात्र तासगावात सेंद्रिय वांगी विकली जाताहेत आणि तीही फॉरच्युनर गाडीतून याचे कौतुक वेगळेच आहे. अर्थात, या गोष्टीची दुसरी बाजू विदारक आहे. डॉ. प्रताप पाटील यांना हा तोटा एकवेळ सहन होईल, मात्र अशाच एकर-दोन एकर फडावर स्वप्नाचे इमले रचणारा छोटा शेतकरी मरतोय, त्याची घुसमट होते. शिवारातील शेतमाल कुजून जातोय. बाजारात ग्राहक नाही, कधीकधी दुचाकीचं पेट्रोल भागत नाही. संकटात पहिला दाढेला जातो शेतकरी. त्याच्या घामाचं मोल होत नाही. असे हजारो शेतकरी सध्या संकटातून वाट काढताहेत. हा काळही सरेल, या विश्‍वासावर जगताहेत.