बेळगावातील बेरोजगारांना रोजगाराची सुवर्ण संधी; येथे मिळणार रोजगार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

बेळगाव शहरात प्रथमच प्रादेशिक स्तरावर भव्य रोजगार मेळाव्याचे 28 व 29 रोजी आयोजन करण्यात आले आहे. शिवबसनरातील एस. जी. बाळेकुंद्री तांत्रिक महाविद्यालयाच्या आवारात होणाऱ्या या मेळाव्यात दोनशेहून अधिक कंपन्यांचा सहभाग असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी दिली.

बेळगाव : शहरात प्रथमच प्रादेशिक स्तरावर भव्य रोजगार मेळाव्याचे 28 व 29 रोजी आयोजन करण्यात आले आहे. शिवबसनरातील एस. जी. बाळेकुंद्री तांत्रिक महाविद्यालयाच्या आवारात होणाऱ्या या मेळाव्यात दोनशेहून अधिक कंपन्यांचा सहभाग असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी बुधवारी (ता.26) पत्रकार परिषदेत दिली. 
बेळगाव आणि धारवाड जिल्ह्यासाठी प्रादेशिक स्तरावर होणाऱ्या या मेळाव्यात बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराची संधी मिळणार आहे. बेळगाव व धारवाड जिल्हा प्रशासन, कौशल्य विकास, औद्योगिक प्रशिक्षण आदिंच्या सहकार्याने मेळावा होत आहे. दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, पीयूसी, आयटीआय, डिप्लोमा, कला-विज्ञान-वाणिज्य यापैकी कोणत्याही शाखेचे पदवीप्राप्त बेरोजगार उमेदवार, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार, अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. 

हे पण वाचा - त्यावेळी मीच तुमचा मंत्री होतो... शरद पवार यांनी जागविल्या त्या आठवणी

आयटी-बीटी, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, मार्केटिंग, सेल्स ऍन्ड रिटेल, टेलिकॉम, बीपीओ, टेक्‍स्टाईल, बॅंकिंग, फायनान्स, इन्शुरन्स, हॉस्पिटल्स, फार्मास्युटिकल्स, हेल्थकेअर, मॅनिफॅक्‍चरिंग, ट्रान्स्पोर्ट, होम नर्सिंग, आहार प्रक्रिया, गारमेंट्‌स, सिक्‍युरिटी आदी कंपन्यांचा मेळाव्यात समावेश असणार आहे. 
18 ते 35 वर्षे वयोगटातील पुरुष- महिला उमेदवार, दिव्यांगांना मेळाव्यात प्रवेश असणार आहे. संकेतस्थळावरून नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांना मेळाव्यात प्रवेश देण्यात येईल. तसेचे मेळावा स्थळावर थेट आल्यास अशा उमेदवारांनाही प्रवेश देण्यात येईल. उमेदवारांनी सकाळी 8 वाजता मेळावा स्थळावर हजर राहणे आवश्‍यक आहे. या मेळाव्याता दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येईल. www.belagaviudyogamela या संकेतस्थळावरून अजून नाव नोंदणी करून घेण्यात येत आहे. 

हे पण वाचा - टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्याची केली बळजबरीने नसबंदी...  

आतापर्यंत 120 कंपन्यांनी मेळाव्यात सहभागी होण्याची तयारी दर्शविली असून 7 हजाराहून अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे. उमेदवारांचे शिक्षण व कंपन्यांची आवश्‍यकता यानुसार उमेदवारांना विविध वर्णातील प्रवेश पत्रिका देण्यात येतील. त्यानुसार उमेदवरांची कंपन्यांमार्फत मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. या मेळाव्याप्रसंगी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वाहन पार्किंग यांची सुविधा देण्यात आली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: organizing employment fair in belgium