अनेक संकटांवर मात करून त्यांनी मुलीला डॉक्टर तर मुलाला अभियंता बनविले

जीवन एक आव्हान असून त्यास आपण स्वीकारले पाहिजे
आबेदा हसन मुल्ला
आबेदा हसन मुल्ला sakal

बेडकिहाळ: जीवन एक आव्हान असून त्यास आपण स्वीकारले पाहिजे, या ध्येयानुसार वाटचाल केल्यास येणाऱ्या परिस्थितीला जिद्दीने तोंड देता येते. त्यातून उत्तम यश मिळते, हेच बेडकिहाळमधील आबेदा हसन मुल्ला यांनी दाखवून दिले आहे. अनेक संकटांवर मात करून त्यांनी मुलीला डॉक्टर तर मुलाला अभियंता बनविले आहे.मनातील जिद्दमुळे त्यांनी हे साध्य केले आहे.

आबेदा मुल्ला यांचे माहेर पुणे (वानवडी). शिक्षण १२ वी पर्यंत झाले. त्यांचे वडील अल्लाउद्दीन सुलेमान कादरी हे आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी, समाजसेवक तर आई आयेशा सुसंस्कारी असल्याने लहानपणापासूनच वेगळ्या पद्धतीने जडणघडण झाली. बेडकिहाळ येथील शेतकरी कुटुंबातील पदवीधर हसन मुल्ला यांच्याशी १९९६ मध्ये त्यांचा विवाह झाला. मुल्ला यांच्या घरी दुभती जनावरे असल्याने बाहेरून जनावरांसाठी चारा आणावा लागत. पाणी पाजणे, जनावरांचे शेण काढणे, शेणी लावणे, स्वयंपाक अशी कामेही होतीच. त्यासाठी प्रारंभी बऱ्याच अडचणी आल्या. पण यावेळी सासरे दस्तगीर मुल्ला, पती हसन मुल्ला यांनी चागंलाच धीर दिला.

आबेदा यांच्या मनात एकच खंत होती की, शिक्षणाअभावी आपणास नोकरी करता आली नाही. पण मुलांनी ती उणीव भरून काढण्यासाठी त्यांनी जिद्ध बाळगली. त्यामुळे मुलगी ताहेरा, मुलगा जहीर प्राथमिक शाळेपासूनच शिक्षणात अग्रेसर आहेत. मुलीला तिच्या इच्छेप्रमाणे मेडिकल क्षेत्रातील शिक्षण देऊन खंबीरपणे उभे करायचे. मुलासही अभियंता बनवायचे, असा निश्चय केला. मुलीला येथील आचार्य देशभूषण आयुर्वेदिक मेडिलक कॉलेजमध्ये बीएएमएसला मुलाला अभियांत्रिकासाठी चिक्कोडी येथील केएलई कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. मुलीस डॉक्टर करण्यासाठी येणारा मोठा खर्च लक्षात घेता घरच्यांचा विरोध होता

पण आबेदा आपल्या निर्णयावर खंबीर राहिल्याने आपले स्वप्न पूर्ण केले. त्यामुळे दोन्ही मुलांच्या आयुष्यात पुढील वाटचाल व करिअरसाठी दिशा मिळाली. प्रसंगी दोन मुलांना उच्चशिक्षण देण्यासाठी बरेच कर्ज काढावे लागले. ते फेडण्यासाठी घरोगरी दही, दूध व शेतातील भाजीपाला विक्री करावा लागला. या बिकट प्रसंगात घरच्या दोन दुभत्या म्हशींचा हातभार लागला. काढलेले कर्ज फेडण्यासाठी हसन यांनी थोडी शेतीही विकली, पण या दाम्पत्याने जिद्द सोडली नाही. मुलांनीही त्यांच्या कष्टाचे चीज केले. याबद्दल डॉ. ताहेरा यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव येथील दत्तकुमार पाटील सेवाभावी संस्था संचलित 'जिजाऊ महिला संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील व मान्यवर महिलांनी केला आहे.

कठीण परिस्थितीत आपल्या मुलीस डॉक्टर, मुलास अभियंता केल्याने आबेदा मुल्ला, हसन मुल्ला दाम्पत्याचा "आदर्श प्रेरक माता-पिता" म्हणून पुरस्कार देऊन शिंगाडे चॅरिटेबलतर्फे डॉ. विक्रम शिंगाडे यांनी गौरविले आहे.

आबेदा मुल्ला

आपली मुले आदर्शवत घडविण्यासाठी आई, वडिलांचे संस्कार, शिकवण महत्वाची आहे. आपल्या मुलांना परिस्थितीची जाणीव करून देणे महत्वाचे आहे. विशेष म्हणजे आपण संघर्षाशी सामना करत जीवन जगल्यास त्याचे फळ उदात्त असून मनांला वेगळे समाधान मिळते. यासाठी पती हसन यांची साथ मोलाची ठरली.

-आबेदा मुल्ला, बेडकिहाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com