esakal | संपत्तीच्या हव्यासाने घुबडांची सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बेळगावात तस्करी 
sakal

बोलून बातमी शोधा

Owls smuggled to Sangli, Solapur, Kolhapur, Belgaum for money

वन्यजीवांना जोपासण्याने अथवा अवयव जवळ बाळगल्याने संपत्तीत वाढ होते, संकटे दूर होतात या अंधश्रध्देतून दुर्मिळ पक्षी, प्राण्यांची तस्करी फोफावली आहे.

संपत्तीच्या हव्यासाने घुबडांची सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बेळगावात तस्करी 

sakal_logo
By
शंकर भोसले

मिरज (जि. सांगली)  : वन्यजीवांना जोपासण्याने अथवा अवयव जवळ बाळगल्याने संपत्तीत वाढ होते, संकटे दूर होतात या अंधश्रध्देतून दुर्मिळ पक्षी, प्राण्यांची तस्करी फोफावली आहे.

घुबड, कासव, मांडूळ, घोरपडीसह अनेक प्राणी, पक्षांच्या तस्करीतून कोट्यवधींची उलाढाल सुरू आहे. काही तांत्रिक सुशिक्षित बेरोजगार तरुण, शिकारीचा नाद असलेल्या तरुणांचा खुबीने वापर करीत आहे. अनेकदा तरुण वनीकरण, पोलिसांच्या कारवायांत सापडल्याने त्यांचे आयुष्य उध्वस्त होते. सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यात तस्करी जोमात आहे. सक्रिय टोळक्‍यांकडून वेगवेगळ्या प्राण्यांची विक्री लाख ते कोटी रुपयांपर्यंत होत असल्याचा प्राणीमित्र संघटनांचा आरोप आहे. 

विकल्या जाणाऱ्या प्राण्यांची छायाचित्रे दाखवून आणि इसारत दिल्यानंतरच व्यवहार ठरवला जातो. उर्वरित रक्कम हाती दिल्यावर सौदा पुर्ण होतो. बेळगाव येथील टोळीने हरणांची तस्करी केल्याची कबुली दिली आहे. झटपट श्रीमंतीसाठी मुक्‍या प्राण्यांच्या सौदा खुले आम तस्करीकडे वनविभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष होते.

मोर पिसांसाठी मोरांची तस्करी हा नवा विषय नाहीच मात्र संपत्तीत वाढ होण्यासाठी हुमा घुबडांची तस्करी होणे म्हणजे या प्रजाती नामशेष करणे हाच उद्देश दिसतो. मांडुळ जवळ बाळगल्याने झटपट श्रीमंत होते. हुमा जातीच्या घुबडाचे पंख व्यवसायाच्या ठिकाणी गल्ल्यात वा खिशात ठेवल्यास इडा पिडा जाते, असेही फंडे मांत्रिक पसरवतात. 

कर्नाटकातील चिक्कोडीत पकडलेल्या हुमा घुबाडासाठी 50 लाखांपर्यंत सौदे ठरत आहेत हे धोकादायक आहे. मांडूळ बाळगल्याने संपत्ती वाढ होते, अशी अंधश्रध्दा पसरवून अनेकांकडून लाखो लुबाडण्याचे काम सुरू आहे. हुमाचा सौदा तीस ते पन्नास लाखांपर्यंत होत असेल तर भविष्यात नक्कीच घुबड चित्रात पहावे लागेल, अशी भिती प्राणी मित्र व्यक्त करतात. 

संपादन : युवराज यादव

loading image
go to top