esakal | गौरीसाठी ऑक्साइड दागिन्यांचा ट्रेण्ड!
sakal

बोलून बातमी शोधा

paschim Mharashtra

गौरीसाठी ऑक्साइड दागिन्यांचा ट्रेण्ड!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निपाणी : गणपती (Ganapti) पाठोपाठ रविवारी घरोघरी गौरींचे (Gauri)आगमन होणार असून गौराईला सजवण्याकरिता यंदा ऑक्साइड (Oxide) दागिन्यांचा ट्रेण्ड, विविध प्रकारचे गौरीचे मुखवटे निपाणी बाजारात (Market) पहायला मिळत आहे. आकर्षक, सुबक अशा दागिन्यांच्या खरेदीकरिता महिलांचा (Ladies) उत्साह पाहायला मिळत आहे.

शुक्रवारी लाडक्या गणेशाचे आगमन झाल्यानंतर रविवारी गौरींचे आगमन होत आहे. एकच दिवस खरेदीसाठी असल्याने अनेकांनी यापूर्वीच गौरीची खरेदी केली आहे. बाजारपेठ गौरी गणपतीच्या सजावटीच्या वस्तूंनी सजली आहे. आकर्षक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी आठवडी बाजार व गणेश चतुर्थीचा बाजार जास्त भरल्याने रस्ते गर्दीने फुलून गेले होते. विविध आकारातील गणपती, गौरीच्या मूर्ती, गौरीचे मुखवट्यासह दागिने, रेडिमेड साड्यांच्या खरेदीसाठी महिलावर्गाची लगबग सुरू आहे. गौरीचे पितळी, शाडू, माती, पीओपीचे मुखवटे बाजारात उपलब्ध आहेत. सुबक आकारातील आखीव रेखीव मुखवटे साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. गौरीसाठी लागणारा दागिन्यांचा साज लक्ष वेधून घेणारा आहे. सोनेरी रंगातील दागिने आणि ऑक्साइड दागिने यंदा आकर्षण ठरले आहेत. ऑक्साइड दागिन्यांना महिला वर्गाची पसंती आहे. गौरीच्या सजावटीच्या वस्तूंच्या दरात १० टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

हेही वाचा: Work From Home करणाऱ्या मोहन जोशींनी घराबाहेर पडावं : महापौर

दागिन्यांमध्ये मोहनमाळ, ठुशी, बोरमाळ, लक्ष्मीहार, चपला हार, मोत्याचे सर, कोल्हापुरी साज, चंद्राचे मंगळसूत्र, कमरपट्टा, मुकुट, बाजूबंद, झुमके, जुड़ापीन, कानातील झुबे, वेल, पूर्ण कानवेल आदी पारंपरिक पद्धतीचे वैविध्यपूर्ण अलंकार पहायला मिळत आहेत. मंगळसूत्रातही विविध प्रकार उपलब्ध आहेत. हे दागिने २०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. पाचवारी, नऊवारी या दोन्ही प्रकारात रेडिमेड साड्या उपलब्ध आहेत. इमिटेशन ज्वेलरीकडे महिलांचा कल असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

यंदा गणरायासाठी सोन्याचे केळीचे झाड आले आहेत. या झाडाला चांगलीच मागणी असल्याचे सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांनी सांगितले. तसेच गजंतलक्ष्मी, मूषक, मोदक, आंब्याचे पान, अष्टविनायक पान, मोत्यांच्या मण्यांच्या बाली, मुकुट, शाल, नेकलेस, शेला, कमळाचे फूल, जास्वंद फूल, मोदकाचे नेकलेस, दुर्वाही विक्रीसाठी आल्या आहेत. सोने, चांदी, इमिटेशन ज्वेलरी बाजारात उपलब्ध आहे. गुरुवारी सोन्याचा दर प्रति तोळा पाचशे रुपये कमी झाल्याने अशी दागिने खरेदीसाठी गर्दी झाली होती.

loading image
go to top