सांगलीला ऑक्‍सिजनचा तुटवडा, परराज्यातील मागवण्याच्या हालचाली ः जयंत पाटील यांची माहिती 

अजित झळके
Friday, 4 September 2020

या घडीला कोल्हापूर जिल्ह्यातून ऑक्‍सिजन पुरवठा होतो, मात्र तेथेही रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याने त्या यंत्रणेने सांगली जिल्ह्याचा पुरवठा कुठल्याही क्षणी थांबवावा लागेल, अशी हतबल सूचना केली आहे.

 

सांगली ः कोरोना रुग्णांची संख्या दर दिवशी सातशेच्या पटीत वाढत असताना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसमोर नवे संकट उभे राहिले आहे. प्रकृती खालावत असलेल्या रुग्णांना ऑक्‍सिजनचा पुरवठा अत्यावश्‍यक असताना आता जिल्ह्याला ऑक्‍सिजन पुरवठाच थांबेल की काय, अशी परिस्थिती समोर उभी ठाकली आहे.

या घडीला कोल्हापूर जिल्ह्यातून ऑक्‍सिजन पुरवठा होतो, मात्र तेथेही रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याने त्या यंत्रणेने सांगली जिल्ह्याचा पुरवठा कुठल्याही क्षणी थांबवावा लागेल, अशी हतबल सूचना केली आहे. त्यामुळे परराज्यातील ऑक्‍सिजन उपलब्ध करण्यासाठी हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिली. 

श्री भगवान महावीर कोविड सेंटरचे उद्‌घाटन श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर महत्वाचे भाष्य केले. ते म्हणाले, ""रुग्णांना बेड मिळत नाही, ही तक्रार आहे. ती दूर करण्यासाठी गतीमान हालचाली करून आपण बेडची उपलब्धता करत आहोत. इस्लामपुरात 100, जतला 190, कवठेमहांकाळला 50, विट्यात 50, आटपाडीत 100, तासगावला 110 बेडची व्यवस्था होत आहे. सांगलीत डॉ. रवींद्र वाळवेकरांसारखे लोक पुढे येत आहेत. कोविड सेंटर सुरु होत आहेत. ज्यांना गरज आहे, असे रुग्णच बेडवर असतील याची खबरदारी घेण्याची सूचना मी केली आहे. त्याबाबत वैद्यकीय क्षेत्राने कटाक्ष पाळावा.

आता त्यापुढे जावून या बेडवर ऑक्‍सिजनचा पुरवठा कसा करायचा, हे मोठे कोडे असणार आहे. कारण, ऑक्‍सिजनची मागणी प्रचंड आहे. सध्या कोल्हापूरमधून पुरवठा होतोय. तेथून फारकाळ आपणाला पुरवठा होईल, अशी चिन्हे नाहीत. परिणामी, परराज्यातून ऑक्‍सिजन मिळवण्याचे प्रयत्न मी सुरु केले आहेत.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oxygen shortage in Sangli: Jayant Patil