esakal | Good News : निपाणीतून होतोय कर्नाटक, महाराष्ट्रात ऑक्सिजन पुरवठा!
sakal

बोलून बातमी शोधा

Good News : निपाणीतून होतोय कर्नाटक, महाराष्ट्रात ऑक्सिजन पुरवठा!

Good News : निपाणीतून होतोय कर्नाटक, महाराष्ट्रात ऑक्सिजन पुरवठा!

sakal_logo
By
- राजेंद्र हजारे

निपाणी (बेळगाव) : गेल्या वर्षापासून कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्त्व आणखी अधोरेखित झाले आहे. कर्नाटकासह महाराष्ट्रात अनेक रुग्ण गंभीर होत असल्याने ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे यंदाच्या मार्चपासून श्रीपेवाडी हद्दीतील निपाणी औद्योगिक वसाहतीमधील प्लॅन्टमधून रोज ५०० ऑक्सिजन सिलिंडर उत्पादनाचे काम २४ तास सुरू आहे. त्यामुळे शेकडो रुग्णांना या प्लॅंटचा आधार मिळत आहे.

प्लँटसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले असले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'ना नफा, ना तोटा' तत्वावर कर्नाटक, महाराष्ट्रात सिलिंडरचा पुरवठा होत आहे. निपाणी येथील डॉ. आशिष पाटील आणि मिलिंद चौगुले यांनी कोरोना काळात या सिलिंडरचा पुरवठा करून सामाजिक दायित्व जपले आहे. ऑक्सिजन अर्थाच प्राणवायु हा मानवाला प्रत्येक क्षणागणिक लागत असल्याने अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याने ऑक्सिजनचे प्रमाणही घटले आहे.

हवेत साधारपणे १५ ते १८ टक्के ऑक्सिजन असतो. तो कॉंप्रेसरच्या माध्यमातून शोषूण घेऊन प्रक्रिया करणारा हा प्लँट डॉ. पाटील आणि चौगुले यांनी निपाणी औद्योगिक वसाहतीमध्ये उभारला आहे. सध्या कर्नाटक-महाराष्ट्रात ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा आहे. येथून ऑक्सिजनचा पुरवठा बेळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील नांदेड, वाशिम, सोलापूर, पुणे, मुंबईसह गरजू भागात केला जात आहे. प्रकल्पासाठी बेळगावचे तत्कालिन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, बेळगाव जिल्हा औद्योगिक वसाहतीचे अधिकारी दोड्ड बसवराज, हेस्कॉम व कर्नाटक बॅंकेचे सहकार्य लाभले आहे.

"ऑक्सिजन प्लॅंटसाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. सिलिंडरच्या माध्यमातून रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. सध्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करत असल्याचे आपणास समाधान आहे."

- डॉ. आशिष पाटील, निपाणी

"कोरोनामुळे कर्नाटकासह महाराष्ट्रात ऑक्सिजनची गरज वाढली आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य रुग्णांचे ऑक्सिजनअभावी हाल होत आहेत. त्यामुळे ना नफा ना तोटा तत्त्वावर ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करत आहोत."

- मिलिंद चौगुले, ऑक्सिजन प्लँटधारक, निपाणी