पलूस नगरपालिका वार्तापत्र :  सत्ताधाऱ्यांची विकासकामांसाठी धावपळ 

संजय गणेशकर
Sunday, 7 February 2021

पलूस नगरपालिकेतील सत्ताधारी कॉंग्रेसची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत असल्याने, सत्ताधारी आणि विरोधकांना निवडणूकिचे वेध लागले आहेत.

पलूस (जि. सांगली) ः पलूस नगरपालिकेतील सत्ताधारी कॉंग्रेसची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत असल्याने, सत्ताधारी आणि विरोधकांना निवडणूकिचे वेध लागले आहेत. उर्वरित नऊ महिन्यात सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाला विकासकामांसाठी धावपळ करावी लागणार आहे.

पलूस पालिका अस्तित्वात आलेनंतर प्रथमच नोव्हेंबर 2016 मध्ये निवडणूक झाली. स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी कॉंग्रेसचे सर्व गट-तट एकत्र आणून ताकदीने निवडणूक लढवली. विरोधी स्वाभिमानी विकास आघाडी, भाजपा व राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्रपणे लढले. या चौरंगी लढतीचा फायदा कॉंग्रेस पक्षाला झाला. स्व. डॉ. पतंगराव कदम, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी निवडणूकीत चांगलेच लक्ष घातले. त्यामुळे कॉंग्रेसला निवडणुकीत घवघवीत यश मिळाले.

नगराध्यक्ष आणि 17 पैकी 12 नगरसेवक कॉंग्रेसचे निवडून आले. कोणत्याही पक्षाचा आधार न घेता स्वाभिमानी विकास आघाडीचे तब्बल 4 नगरसेवक, भाजपाचा 1 नगरसेवक निवडून आला. राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नाही. पालिका निवडणूकीत कॉंग्रेसला 43.34 टक्के, स्वाभिमानी आघाडीला 25.17 टक्के, भाजपाला 16.59 , राष्ट्रवादीला 10. 81 टक्के मते मिळाली होती.

गेल्या चार वर्षांच बर्याच घडामोडी घडल्या. दुर्दैवाने आमदार डॉ. पतंगराव कदम, ज्येष्ठ नेते वसंतराव पुदाले आणि स्वाभिमानी आघाडीचे नेते बापूसाहेब येसुगडे यांचे निधन झाले. पलूसच्या राजकारण, समाजकारण, सहकार क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. आगामी निवडणूक या तीघांच्या पश्‍चात लढवावी लागणार आहे.

निवडून आलेल्या सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष यांना पलिकेचा कारभार नवखाच होता. सत्ताधारी कॉंग्रेसचे नगराध्यक्ष , नगरसेवक यांचे निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू होती. राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी वेळोवेळी पालिकेत, प्रभागात बैठका घेऊन आढावा घेतला.अडचणी समजावून घेतल्या. कारभार्यांना कामाबाबत सूचना केल्या. डॉ. कदम यांनी सर्वात महत्वाची पिण्याच्या पाण्याची 35 कोटी योजना मंजूर केली आहे. 

कॉंग्रेसने जाहीरनाम्यामध्ये दिलेली किती आश्वासने पूर्ण केली. याचे मोजमाप आगामी पालिका निवडणुकीत होणार आहे. सांडपाणी- घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, पं. विष्णू दिगंबर पलूसकरांचे स्मारक, स्मशानभूमी,ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा भवन,व्रुध्दाश्रम, बालकांसाठी पाळणाघर, सामाजिक न्याय भवन,क्रिडासंकुल, ग्रंथालय, व्यायामशाळा कुस्ती संकुल, पालिका ईमारत, हुतात्मा स्मारक व गांलतळ्याचे सुशोभिकरण मध्यभागी छ. शिवाजी महाराजांचा अश्वरूप पुतळा उभारणे अशी विविध आश्वासने दिली होती. उर्वरित नऊ महिन्यात सत्ताधारी कॉंग्रेसला यासाठी कंबर कसावी लागणार आहे. 

युती कोणाबरोबर होणार 
गेल्या वेळी सर्वच पक्ष, विकास आघाडी स्वतंत्रपणे लढले. त्यामुळे कॉंग्रेसला निवडणूक सोपी गेली. आगामी निवडणुकीत कोण- कोणाबरोबर युती करणार. याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Palus Municipal Newsletter:Ruling party rush for development works