शिराळा परिसरात आढळला 'हा' दुर्मिळ पक्षी

शिवाजीराव चौगुले
बुधवार, 10 एप्रिल 2019

एक नजर

  • शिराळा येथे गोरक्षनाथ मंदिरा जवळील मोरणा नदीच्या परिसरात दुर्मिळ स्वर्गीय नर्तक पक्षाचा वावर
  • चांदोली अभयारण्यातही पक्षाचा वावर असण्याचा तज्ज्ञाचा अंदाज
  • हा पक्षी विशाळगड, आंबा तसेच इचलकरंजी परिसरातही पक्षी निरीक्षकांना आढळल्याची नोंद

 

शिराळा - येथील गोरक्षनाथ मंदिरा जवळील मोरणा नदीच्या परिसरात दुर्मिळ स्वर्गीय नर्तक पक्षाचा वावर असल्याची माहिती  डॉ. आर. आर. देवकर यांनी दिली. देवकर या भागात फिरण्यासाठी गेले असता त्यांना हा पक्षी दिसला.

डॉ. देवकर हे चिखली येथील देशभक्त आनंदराव नाईक महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख आहेत. ते गोरक्षनाथ  मंदिर परिसरात मोरणा नदीतीरावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना लांब शेपटी आणि पांढऱ्या रंगाचा स्वर्गीय नर्तक पक्षी (प्याराडाइज फ्लाय केचर) दिसला.  सुमारे तासभर या स्वर्गीय नर्तक नराचे निरीक्षण त्यांनी केले. यावेळी त्यांना या पक्षाची मादीही आढळून आली.

अशी असतो स्वर्गीय नर्तक पक्षी -

या पक्षाच्या दोन प्रजाती आहेत. एक जात भारतात तर दुसरी जात श्रीलंकेत आढळते. नराला लांब शेपूट असते, त्यामुळे तो अतिशय देखणा दिसतो. पूर्ण वाढ झालेला नर पांढऱ्या रंगाचा असतो, तर लहान नर आणि मादी लाल रंगाची असते. स्वर्गीय नर्तकाची मान व चोचीकाडील भाग काळपट गडद रंगाचा असतो. डोक्यावर लहान तुरा, दोन पिसाची दीड फुट लांब
असणारी शेपटी यामुळे त्याचे सौदर्य अधिक खुलून दिसते .

मध्यप्रदेशचा राज्य पक्षी म्हणून ओळख

स्वर्गीय नर्तकचा वावर मुख्यतः उत्तर प्रदेश मधील जंगलात आढळतो. मध्य प्रदेशचा  ‘राज्य पक्षी’ म्हणून स्वर्गीय नर्तकची ओळख आहे. मध्यप्रदेशातील बांधवगड राष्ट्रीय उद्यानात स्वर्गीय नर्तक मोठ्या प्रमाणात आढळतो.  हिंदीमध्ये त्याचे ‘दुधराज’असे नाव आहे  ‘स्वर्गीय नर्तक’ हवेत संचार करताना शेपटी मधील दोन पिसांची हालचाल कापडी रिबन हवेमध्ये फिरवल्यासारखी सुंदर दिसते .लहान किडे, अळ्या हा स्वर्गीय नर्तकचा प्रमुख आहार आहे .हा पक्षी विशाळगड, आंबा तसेच इचलकरंजी परीसरातही पक्षी निरीक्षकांना आढळून आला आहे .

पक्षाचे शिराळा परिसरात पहिल्यांदाच दर्शन झाल्यामुळे आनंद झाला. मध्यप्रदेशातील बांधवगड राष्ट्रीय उद्यानात स्वर्गीय नर्तक मोठ्या प्रमाणात आढळतो. दुर्मिळ स्वर्गीय नर्तक शिराळा शहरानजीक आहे,याचा अर्थ तो चांदोली अभयारण्यातही असणार आहे.
- डॉ. आर. आर. देवकर,  
देशभक्त आनंदराव नाईक महाविद्यालय, चिखली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Paradise Flycatcher found in Shirala region