परळी बनलंय गणेशमूर्तींचं गाव!

दीपक शिंदे
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

राज्यभरातून मागणी; रंगकामातील कौशल्याने मुंबई, पुणेकरांनाही आकर्षण

राज्यभरातून मागणी; रंगकामातील कौशल्याने मुंबई, पुणेकरांनाही आकर्षण

परळी - सातारा शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेले परळी गाव हे सध्या वेगवेगळ्या आणि आकर्षिक गणेशमूर्तींच्या रंगकामात दंग झाले आहे. या ठिकाणी असलेल्या कुंभार समाजाने गणेशमूर्तींना वेगळाच साज चढविला आहे. त्याच्यापुढे जाऊन वाईकर बंधूंनी आपल्या गणेशमूर्तींच्या रंगकामातील कौशल्याने पुणे, मुंबईतील बाजारपेठेतही स्थान मिळवले आहे.
गणेशोत्सवाला अजूनही वेळ असला तरी परळीकडे गणेशमूर्तींच्या बुकिंगसाठी लोकांची गर्दी वाढू लागली आहे. परळीतील कुंभार समाजाने आपली पारंपरिकता जपतच गणेशमूर्तींच्या निर्मितीमध्ये आधुनिकताही आणली आहे. त्यामुळे येथील गणेशमूर्तींची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

गेल्या काही वर्षांत परळी गावात गणेशमूर्ती निर्मिती हा व्यवसायच झाला आहे. त्यामुळे वर्षभर या गणेशमूर्तींचे काम या ठिकाणी चालते. ज्या लोकांना रोजगार नव्हता, असे लोक या ठिकाणी वर्षभर काम करून आपला चरितार्थ चालवितात. गावाजवळच रोजगाराचीही सोय झाल्याने त्यांच्यामध्येही समाधान दिसते.  परळी भागातील ६० गावे ही कुंभार समाजातील काही कुटुंबांनी वाटून घेतली होती. त्या गावातील लोकांना लागणाऱ्या मातीच्या सर्व वस्तू या समाजाकडून घरपोच केल्या जात होत्या. त्याबदल्यात त्यांना भात किंवा अन्य अन्नधान्य दिले जाते. ही प्रथा आजही काही प्रमाणात सुरू असलेली दिसते. हळूहळू कुंभार समाजातील तरुण पिढीने वैविध्यपूर्ण गणेशमूर्ती घडविण्याकडे आपला कल निर्माण केला आणि त्यामध्ये त्यांना यश येत गेले. गेल्या काही वर्षांत आता परळीतूनच सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आणि पुणे, मुंबईकडेही गणेशमूर्ती जातात. वाईकर बंधूंनी तर रंगकामातील आपले वेगळेपण जपत बाजारपेठेत आपले वैशिष्ट्यच निर्माण केले आहे. 

गेली २० वर्षे आम्ही गणेशमूर्ती तयार करत आहोत. त्यामध्ये सातत्य असल्याने वैशिष्ट्यपूर्ण आणि आकर्षक रंगसंगतीमध्ये गणेशमूर्ती तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले आहे. त्यामुळे राज्यभरातून गणेशमूर्तींना मागणी आहे. 
- उमेश वाईकर, मूर्तीकार, परळी

Web Title: parli satara news ganeshmurti village