Sangli: फुटीर नगरसेवकांचा अपात्रतेची सुनावणी लांबणीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

court

सांगली : फुटीर नगरसेवकांचा अपात्रतेची सुनावणी लांबणीवर

सांगली : सात महिन्यांपूर्वी झालेल्या महापौर निवडीवेळी बंडखोरी केलेल्या भाजपच्या सहा नगरसेवकांच्या सदस्यत्व अपात्रतेची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून भाजपचे गटनेते विनायक सिंहासने यांना याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. मात्र पुढील सुनावणी कधी होणार ते स्पष्ट केलेले नाही.

सात महिन्यांपूर्वी २३ फेब्रुवारीस महापालिकेत महापौर- उपमहापौर निवडी झाल्या होत्या. यावेळी भाजपने आपल्या सर्व सदस्यांना व्हीप बजावला होता. तरीही स्नेहल सावंत, महेंद्र सावंत, नसिमा नाईक, अपर्णा कदम यांनी पक्षादेश डावलून विरोधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान केले. तर आनंदा देवमाने आणि शिवाजी दुवें मतदानास गैरहजर राहिले. त्यामुळे भाजपचे महापौरपदाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी व उपमहापौरपदाचे उमेदवार गजानन मगदूम यांचा पराभव होऊन महापालिकेतील भाजपची सत्ता गेली. यांना राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी व काँग्रेसचे उमेश पाटील विजयी झाले होते.

भाजपने व्हीप बजावूनही तो डावलणाऱ्या सहा नगरसेवकांना अपात्र ठरवावे या मागणीसाठी गटनेते विनायक सिंहासने यांनी विभागीय आयुक्तांकडे १९ मार्च रोजी तक्रार दाखल केली होती. कोरोना लाटेमुळे ही सुनावणी लांबणीवर पडली होती. यापूर्वीही दहा ऑगस्टला सुनावणीची तारीख जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी ती रद्द करण्यात आली. आता दुसऱ्यांदा सुनावणीची तारीख देऊनही प्रशासकीय कारणास्तव सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

याबाबत नगरपालिका प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त पूनम मेहता यांनी तक्रारदार भाजप गटनेते विनायक सिंहासने यांना पाठवलेल्या पत्रात प्रशासकीय कारणास्तव आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणीची तारीख नंतर कळविण्यात येईल असे म्हटले आहे. यामुळे पुन्हा एकदा भाजपच्या फुटीर नगरसेवकांच्या अपात्रतेच्या तक्रार अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडली आहे.

टॅग्स :CourtPaschim maharashtra