प्रवाशांची सुरक्षा पहिली...एसटी बसेसमध्ये बसविले पडदे 

घनश्‍याम नवाथे 
Monday, 7 September 2020

"प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्‍य घेऊन सध्या निम्म्या क्षमतेने प्रवासी घेऊन तोट्यात धावणाऱ्या एसटीच्या काही गाड्यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पडदे बसवले आहेत. सध्या काही गाड्यांमध्ये ही सुविधा दिली आहे.

सांगली : "प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्‍य घेऊन सध्या निम्म्या क्षमतेने प्रवासी घेऊन तोट्यात धावणाऱ्या एसटीच्या काही गाड्यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पडदे बसवले आहेत. सध्या काही गाड्यांमध्ये ही सुविधा दिली आहे. लवकरच इतर गाड्यांमध्येही अशा प्रकारे व्यवस्था केली जाईल. 
राज्यातील एसटीचा तोटा कमी करण्यासाठी परिवहन मंडळाने मार्च व एप्रिल महिन्यात भारमान वाढवा अभियान जाहीर केले होते. परंतु मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यानंतर 23 मार्चपासून एसटीचे चाक थांबले. 

भारमान वाढवा अभियानातच एसटी बंद राहिली. तसेच उन्हाळी सुटी म्हणजे एसटीच्या उत्पन्नवाढीचा काळ देखील कोरोनामुळे वाया गेला. तरीही प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्‍य सार्थ ठरवताना लॉकडाउन काळात जिल्ह्यात अडकलेल्या परप्रांतिय मजूर, विद्यार्थी आदींना सोडण्यासाठी एसटी धावली. राज्यातील विविध जिल्ह्यापासून ते परराज्यातही एसटी गेली. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावले. 

जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा वाहतुकीसाठी एसटी सध्या धावत आहे. परंतु प्रवाशांच्या सेवेसाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. एका आसनावर एकच प्रवासी याप्रमाणे निम्म्या क्षमतेने आणि तोट्यात एसटी धावते. तसेच कोणतीही प्रवासी भाडेवाढ करण्यात आली नाही. प्रत्येक फेरीनंतर एसटी बस निर्जंतुकीकरण केली जाते. प्रवाशांना मास्कची सक्ती केली जाते. त्याचबरोबर वयोवृद्ध प्रवाशांना घेऊनही एसटी धावत आहे. 

प्रवाशांच्या सेवेसाठी नव्हे तर आता प्रवाशांच्या सुरक्षेसाठीही एसटी तत्पर झाली आहे. काही गाड्यांमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी आसनाच्या मधोमध कापडी पडदा टाकण्यात आला आहे. एकमेकांना संसर्ग होऊ नये यासाठी ही उपाययोजना केली आहे. सध्या काही गाड्यांमध्ये अशी व्यवस्था केली आहे. प्रवासी वर्गातून या सुधारणेचे स्वागत होत आहे. तसेच लवकरच इतर काही गाड्यांमध्येही अशा प्रकारे व्यवस्था केली जाणार आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passenger safety first ... curtains installed in ST buses