मुलाच्या जाण्याने वडिलांचाही गेला प्राण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

मुलाच्या निधनाची बातमी समजताच वडील संपत धेंडे यांना मोठा धक्का बसला. यातून ते सावरले नाहीत. मुलाच्या जाण्यानंतर अवघ्या दोन तासांत त्यांनीही मृत्यूला जवळ केले.

श्रीगोंदे : सेवा संस्थेच्या कर्जासोबतच लोकांकडून घेतलेले उसने पैसे परत करणे अडचणीचे झाले. यातच मुलीचा विवाह ठरल्याने अडचणी वाढल्या. त्यामुळे धनाजी संपत धेंडे (वय 46) या शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. मुलाच्या अकस्मात जाण्याने संपत नामदेव धेंडे (वय 62) यांनीही दोन तासांच्या अंतराने प्राण सोडला. तालुक्‍यातील शेडगाव येथे ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. 
याबाबत तेथील सरपंच विजय शेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धेंडे कुटुंबाला दोन एकर जमीन आहे. मात्र, घरची परिस्थिती बेताची असल्याने हे कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. मृत झालेले धनाजी यांच्या मुलीचा विवाह ठरला होता. साखरपुडाही झाला. मात्र, त्यांची अडचणीत भर पडली. यातून त्यांनी बुधवारी रात्री विषारी औषध पिऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. घरच्या लोकांनी त्यांना श्रीगोंदे शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, शुक्रवारी रात्री त्यांचे निधन झाले. 

बाप-लेकावर एकत्र अंत्यसंस्कार

 मुलाच्या निधनाची बातमी समजताच वडील संपत धेंडे यांना मोठा धक्का बसला. यातून ते सावरले नाहीत. मुलाच्या जाण्यानंतर अवघ्या दोन तासांत त्यांनीही मृत्यूला जवळ केले. बाप-लेकावर एकत्र अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्या कुटुंबासोबतच गावकऱ्यांवर आली. या प्रकरणी श्रीगोंदे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the passing of the child, the father died