महाराष्ट्रवासीयांना बेळगावातही मिळते पासपोर्ट सेवा

सतीश जाधव
Thursday, 3 December 2020

महाराष्ट्रातील नागरिकांनाही बेळगावात पासपोर्ट काढता येतो. मात्र, ते यापासून अनभिज्ञ आहेत.

बेळगाव : सुमारे दोन वर्षापूर्वी बेळगाव शहरात पासपोर्ट कार्यालय सुरु झाले आहे. याचा लाभ बेळगाव जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातील नागरिक घेत आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांनाही बेळगावात पासपोर्ट काढता येतो. मात्र, ते यापासून अनभिज्ञ आहेत. यामुळे अनेक जण कोल्हापूरला जावून पासपोर्ट काढून घेत आहेत. यात त्यांना आर्थिक भूर्दडासहित, अनेक अडचणीही सहन कराव्या लागत आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत देशात पासपोर्ट सेवा केंद्रे कार्यरत आहेत. यामुळे कागदपत्रे बरोबर असतील तुम्ही देशातील कोणत्याही राज्यात पासपोर्ट काढू शकता. संबंधीत पोलिस स्थानकाकडून चौकशी केली जाते. त्यानंतर आपल्याला पासपोर्ट मिळतो. मात्र, याची माहिती अनेकांना नसल्याने ते बुचकळ्यात सापडले आहेत. यामुळे बेळगाव शहराला लागून असलेले महाराष्ट्रातील नागरिक कोल्हापूरला जाऊन आपला पासपोर्ट बनवून घेत आहेत.

हेही वाचा -  ‘विकोआ गोखलेई’ नव्या जागतिकस्तरीय फूल वनस्पतीचा शोध! -

बेळगाव शहरला लागून चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुके आहेत. या तालुक्‍यातील अनेकजण परदेशात नोकरीसाठी प्रयत्न करतात. यामुळे अनेक जण पासपोर्ट काढून घेतात. 
चंदगड तालुक्‍यापासून बेळगाव हाकेच्या अंतरावर आहे. तसेच कोल्हापूर सुमारे 150 किलोमीटर आहे. मात्र, बेळगावातही पासपोर्ट काढून दिला जातो, याची माहिती त्यांना नसल्याने ते कोल्हापूरला पासपोर्ट काढून घेण्यासाठी जातात.

लॉकडाउनमुळे बेळगावातील पोस्ट ऑफीस पासपोर्ट सेवा केंद्र समारे 7 महिने बंद होते. मागील दोन महिन्यांपासून कार्यालय सुरु झाले आहे. सध्या रोज 25 जणांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. गेल्या दोन महिन्यात आतापर्यंत 800 हून अधिक जणांनी पासपोर्ट काढून घेतला आहे. जानेवारीपासून कागदपत्र पडताळणीची संख्या 50 केली जाणार आहे. सध्या परदेशातील विमान वाहतूक बंद असल्याने पासपोर्ट काढण्यासाठीही कमी गर्दी होत आहे. परदेशातील विमानसेवा सुरु झाल्यास गर्दी वाढणार आहे.

येथे करा अर्ज

पासपोर्टसाठी www.passport.gov.in या वेबसाईटवर जावून अर्ज करावा. पत्ता, नाव,आधार क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक, स्थानिक पोलिस स्थानकाचे नाव, पिनकोड, वडिलांचे नाव, दिल्यानंतर कागदपत्रे अपलोड करावी. संपूर्ण माहिती दिल्यानंतर पासपोर्ट केंद्रात कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तारीख देण्यात येते. त्या दिवशी कागदपत्रे सादर करावी. त्यानंतर पोलिस चौकशी होते व 20 ते 25 दिवसात पासपोर्ट मिळतो. यासाठी 1500 रुपये ऑनलाईन शुल्क आहे.

हेही वाचा - बेळगावात मोकाट जनावरांसाठी गोशाळांची व्यवस्था -

"देशातील कोणत्याही व्यक्तिला कोठेही पासपोर्ट काढता येतो. बेळगावातील पासपोर्ट कार्यालयात महाराष्ट्रातील नागरिक पासपोर्ट काढून घेण्यासाठी येत आहेत. रोज 25 जणांच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. जानेवारीपासून ही संख्या वाढविली जाणार आहे."

- कृष्णा तळवार, पासपोर्ट अधिकारी
 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: passport service are available in belgaum also its beneficial for people in belgaum