पाटणमध्ये पारंपरिक ‘श्रेयवादा’ला स्वल्पविराम?

जालिंदर सत्रे
सोमवार, 26 मार्च 2018

पाटण - कोयनानगर येथे २३ दिवस चाललेल्या ठिय्या आंदोलनावरून तालुक्‍यात पत्रकार परिषद व प्रसिद्धिपत्रकाद्वारे श्रेयवादाची लढाई चाललेली आहे. आमदार शंभूराज देसाई, श्रमिक मुक्ती दल व भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे कोयना विभागातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे मात्र अलिप्त असल्याने तालुक्‍यात प्रथमच पारंपरिक देसाई-पाटणकरांच्या राजकीय श्रेयवादाला हा अपवाद असलेला पाहावयास मिळतो.

पाटण - कोयनानगर येथे २३ दिवस चाललेल्या ठिय्या आंदोलनावरून तालुक्‍यात पत्रकार परिषद व प्रसिद्धिपत्रकाद्वारे श्रेयवादाची लढाई चाललेली आहे. आमदार शंभूराज देसाई, श्रमिक मुक्ती दल व भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे कोयना विभागातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे मात्र अलिप्त असल्याने तालुक्‍यात प्रथमच पारंपरिक देसाई-पाटणकरांच्या राजकीय श्रेयवादाला हा अपवाद असलेला पाहावयास मिळतो.

गेली ६४ वर्षे रखडलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी राजकारण बाजूला ठेऊन श्रमिक मुक्ती दलाच्या झेंड्याखाली एकत्र आलेल्या प्रकल्पग्रस्तांनी २३ दिवस ठिय्या आंदोलन केले. आंदोलनासंदर्भात विधानभवनात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडल्यानंतर झालेल्या सकारात्मक चर्चेवरून श्रेयवादाची लढाई पत्रकार परिषदा व प्रसिद्धिपत्रकांच्या माध्यमातून सुरू झाली आहे. बैठक झाल्यानंतर डॉ. भारत पाटणकरांनी पत्रकार परिषद व जाहीर मेळाव्यात आपली भूमिका जाहीर करून आंदोलन स्थगित केले. यावेळी विधानभवनात झालेल्या घडामोडी व राजकीय हस्तक्षेप याबाबत त्यांनी प्रकट मत व्यक्त केले. बैठकीचे निमंत्रण व बैठक घेण्यात राजकीय मंडळींना आलेले अपयश व अधिकाऱ्यांची मध्यस्थी व 
आंदोलनाला मिळालेली दिशा याबाबत व काही घटनांवर टीका- टिप्पणी केली. 

मेळावा व पत्रकार परिषदांच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर आमदार देसाई यांनी नेहमीच्या पद्धतीने डॉ. पाटणकरांवर आरोप केले व स्वतःच्या स्वार्थासाठी घरणग्रस्तांना वेठीस धरणे, काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी श्रेय घेण्याचा प्रयत्न करणे असे आरोप केले. त्यात भाजपचे तालुका उपाध्यक्ष नंदकुमार सुर्वे यांनी भर घातली व माधव भंडारींच्या नेतृत्वाखालील जनजागरण संघटनेच्या माध्यमातून हा निर्णय झाल्याचे पत्रक व पत्रकार परिषदेत फक्त तीन मागण्यांबाबत आग्रही असल्याचे नमूद केल्याने वाद वाढत गेला.

श्रमिक मुक्ती दलाच्या तालुका कार्यकारिणीने पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांचे व श्रेयवादाचे खंडण केले. त्यामध्ये आमदार देसाई व नंदकुमार सुर्वे यांच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. आंदोलन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून नव्हे तर प्रकल्पग्रस्त म्हणून उभारले, डॉ. पाटणकरांना विधानसभा लढवाईची नाही, पाच लोकप्रतिनिधींना प्रोटोकॉल नाही तो आमदार देसाईंनाच कसा, बैठकीच्या निमंत्रणाची एकच जावक क्रमांक असणारी दोन निमंत्रणे कशी, भूकंपग्रस्त दाखल्यांबाबत झाले ते होऊ देणार नाही, २३ दिवस जनजागरण संघटना कोठे होती व भाजपच्या नंदकुमार सुर्वेंनी प्रवेश पास दाखवावा, असे आरोप करून या वादात भर घातली.

राष्ट्रवादी व काँग्रेस अलिप्त 
तालुक्‍याने देसाई-पाटणकर असा राजकीय श्रेयवाद पाहिला असून, या श्रेयवादात पाटणकरांची राष्ट्रवादी व काँग्रेस अलिप्त असल्याचे पाहावयास मिळत असून, पारंपरिक लढाईत ही श्रेयवाद लढाई वेगळेपण देणारी व उन्हाळ्यात वातावरणात गरम हवा आणणारी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: patan news politics