मुलीच्या आग्रहासाठी घरात होता 26 बेवारस मांजराचा वावर अन्...

cat
cat

इस्लामपूर (सांगली) - घरात एखादं मांजर सांभाळायचं तर काय व्याप असतात हे पाळणाऱ्यांलाच माहीत. येथील कचरे गल्लीतील पटेल कुटुंबाने अवघ्या शंभर चौरस फुटांच्या घरात थोडी थोडकी नव्हे तर तब्बल अकरा मांजरे पाळली आहेत.  
सुहेल आणि तबस्सुम पटेल यांच्या मांजरवेल्हाळ कुटुंबाची ही कहाणी, सध्या त्यांच्याकडे पर्शियन जातीची सहा मांजरे आणि इतर जातीची पाच  मांजरं आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे अशी २६ मांजरे होती. हे घर असं का याचा किस्सा अजबच.

टकल्या, लाल्या, किऊ, लड्डू असी मांजरांची नावे

साडे चार वर्षांपूर्वी सुहेल यांनी सातारा येथून एक पर्शियन मांजर आणले. लड्डू त्याचे नाव. पटेल यांना शिफा नावाची  मुलगी आहे. सुरवातीला तिला हे मांजर आवडायचे नाही; पण नंतर आठवड्यात मात्र तिला मांजरांचा इतका लळा लागला की, आजूबाजूला  कुठेही एखादे बेवारस मांजराचे पिल्लू दिसले तरी ती त्याला घरी आणण्याचा आग्रह धरायची. त्यामुळे घरातील मांजराची संख्या वाढता वाढे अशी झाली. तशी मांजरं एकाच घरात कायम राहतातच असं नाही. त्यातली काही थांबतात, काही परत जातात. कालांतराने ती परतता असा या पटेल कुटुंबाचा स्वानुभव. मात्र ते आलेल्या प्रत्येक मांजराला आश्रय देतात. त्यांचे लाडाने संगोपन करतात. त्यांनी त्यांचं बारसंही घातलंय. टकल्या, लाल्या, किऊ, लड्डू, ऐश्वर्या, गोलू, जिमी अशा नावांनी त्यांनी हाक मारली की तेच मांजर जवळ येते. घरभर बघू तिकडे त्यांचा निवांत वावर असतो. त्यांच्यासाठी अंथरूण-पांघरूणाचा थाटही आहे. चिमुरड्या सफामुळे साऱ्या पटेल कुटुंबालाच मांजरांचा लळा लागला आहे. आता आजूबाजूची अनेक मंडळी घरात मांजर नको असेल तर ते पटेल कुटुंबीयांच्या स्वाधीन करतात तर काही त्यांच्याकडून पिले मागून नेतात. 

या मांजरांमुळे पटेल कुटुंबीयांना बाहेरगावी जायचं अवघड होतं. कारण ही प्रजा सांभाळायची कशी? या प्रजेचा खाऊचा खर्चही मोठा. दीड हजाराची कॅट फूड, बाराशे रुपयांची सप्लिमेंट, कॅल्शियमच्या गोळ्या असं बराच काही खर्च आहे. उन्हाळ्यात त्यांच्यासाठी फॅन, एसीची व्यवस्था करावी लागते. घरातील फर्निचरला ते बिनधास्त ओरखडतात. ते सहन करावे लागते. त्यांचा केससांभार घरभर पसरला तरी सहन करावा लागतो. आठवड्यातून एकदा सर्वच मंडळीना न्हाऊ घालावे लागते. गरज पडली तर दवाखाना आलाच. त्यांना जपण्यासाठी पटेल कुटुंब गुगल सर्च करून अद्ययावत ज्ञानाची साधना करीत असते. त्यांनी मांजरांना चांगलीच शिस्त लावली आहे. ते शीशू...कधी घरात करीत नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com