स्थापत्य अभियंता घेतोय मोत्यांचे पीक

धर्मवीर पाटील
सोमवार, 10 जून 2019

इस्लामपूर - साखराळे (ता. वाळवा) येथील दिग्विजय प्रताप पाटील यांनी गोड्या पाण्यातील मोती पालन शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. माणिक, मोती समुद्राच्या तळाशी शिंपल्यांच्या पोटात निर्माण होतात;  मात्र हेच मोती शेतात पिकविले जाऊ लागले आहेत.

इस्लामपूर - साखराळे (ता. वाळवा) येथील दिग्विजय प्रताप पाटील यांनी गोड्या पाण्यातील मोती पालन शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. माणिक, मोती समुद्राच्या तळाशी शिंपल्यांच्या पोटात निर्माण होतात;  मात्र हेच मोती शेतात पिकविले जाऊ लागले आहेत.

त्यासाठी शेततळ्यांतील गोड्या पाण्यात शिंपली सोडली जातात. या शिंपल्यांमध्ये न्यूक्‍लिअस (शिंपल्यात सोडण्यात येणारी डिझाईन) सोडली जातात. दिग्विजय यांनी ३ वर्षे सरकारी नोकरी केल्यानंतर या शेतीपूरक व्यवसाय-उद्योगातील आवडीमुळे ते या क्षेत्रात आले आहेत.

श्री. पाटील म्हणाले,‘‘नाशिक येथे कृत्रिमरीत्या  शिंपल्यातून मोती तयार करवून घेतले जातात हे  समजताच प्रत्यक्ष माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी राजस्थानातील सवाई माधवपूर येथील अचलसिंग यांच्या ‘ग्लिटराटी पर्ल फार्म’मध्ये जाऊन मोती पालन शेतीचे (पर्ल फार्मिंग) प्रशिक्षण घेतले. त्यांनीच बाजारपेठेचीही हमी दिली. त्यानंतर त्यांनी मामा रणजित देसाई यांच्या येडूर येथील शेतीत हा प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला.

म्हैसाळपासून सुमारे २५ किमी अंतरावर मामांची  सव्वाशे एकर शेती आहे. त्यात ७ एकर एकर हरितगृह आहे. तिथे शेततळे तयारच होते. मत्स्य प्रकल्पही होता. १५ किलोवॉटचा सौर ऊर्जा प्रकल्पही आहे. एकूणच प्रगत अशी देसाई कुटुंबीयांची शेती आहे. त्यामुळे त्या वातावरणात उपलब्ध पायाभूत सुविधांचा वापर करून  मोती पालनाचा त्यांनी प्रकल्प सुरू केला. 

आम्ही २० हजार शिंपले सोडली आहेत. त्या प्रत्येक शिंपल्यात दोन न्यूक्‍लिअस घातले आहेत. अगदी ५० टक्के उत्पादन गृहीत धरले तरी १० हजार शिंपल्यातून २० हजार मोती मिळतील. प्रत्येक मोत्यास रुपये १०० दर मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यातून १८ ते २० लाखांचे उत्पन्न  अपेक्षित आहे. प्रकल्पाची सुरवात ५ हजार शिंपल्यापासूनही होऊ शकते. युवकांनी अशा नव्या वाटांचा शोध घ्यावा.

देशांतर्गत बाजारपेठेत दरवर्षी पन्नास लाख मोत्यांची मागणी आहे. सध्या १० ते १२ लाख मोत्यांचे उत्पादन होते. चीन, दुबई, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांमधूनही विविध डिझाइन्सच्या मोत्यांना मोठी मागणी आहे. तरुणांनी धाडसाने पुढे यावे. आम्ही त्यांना सर्वोतोपरी मदत करू.
- प्रताप पाटील,
सचिव, राजारामबापू साखर कारखाना.

मोत्यांची शेती म्हणजे काय?

मोती हे एक नैसर्गिक रत्न आहे आणि ते मोलस्क नावाच्या शंबुकामध्ये (शिंपल्यामध्ये) तयार होते.  नदीतून शिंपले आणल्यानंतर ते धुऊन स्वच्छ केले जातात. त्यानंतर ते आठ दिवस पाण्याने भरलेल्या टॅंकमध्ये ठेवले जातात. त्या पाण्याचे तापमान नदीच्या तापमानाइतके ठेवण्यात येते. शिंपले पाण्याला सरावले, की त्यांच्यावर लहानशी शस्त्रक्रिया केली जाते. त्यामध्ये त्यांच्यात मोत्यांच्या बीजांचे रोपण केले जाते. बीज दोन पद्धतीचे असते. एक डिझायनर पर्ल आणि दुसरे राऊंड पर्ल. प्रक्रिया केलेले शिंपले काही दिवस वेगळ्या पाण्यात ठेवले जातात. त्यापैकी काही शिंपले मरण पावतात, तर काही त्या बीजांना स्वीकारतात. तशा शिंपल्यांना काढून मोठ्या टॅंकमध्ये ठेवले जाते. त्यानंतर पाण्यात शिंपल्यांसाठी खाद्य टाकणे, पाण्याचे तापमान ठरावीक पातळीवर मर्यादित ठेवणे, मरण पावलेले शिंपले दूर  करणे अशी काळजी घ्यावी लागते. डिझायनर पर्ल तयार होण्याचा कालखंड आठ ते दहा महिन्यांचा असतो. तर राऊंड पर्ल तयार होण्यासाठी किमान पंधरा महिने  लागतात. तयार झालेले डिझायनर पर्ल ऐंशी रुपयांपासून साडेतीनशे रुपयांपर्यंत तर राऊंड पर्ल हजार रुपयांपासून पुढे विकले जातात. मोत्यांची प्रत चांगली असेल तर एक मोती वीस-बावीस हजार रुपयांपर्यंतदेखील विकला  जातो. या शेतीसाठी गोड्या पाण्यातील शिंपले आवश्‍यक असतात. भारतात आणि इतरत्र मोत्यांची मागणी वाढत असूनसुद्धा त्यांचा नैसर्गिक पुरवठा मात्र अतिवापरामुळे आणि प्रदूषणामुळे कमी होत चालला आहे. भारतात घरगुती मागणी पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय  बाजारपेठेतून दरवर्षी मोठ्या प्रमाणात संस्करित मोत्यांची आयात करतो. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवॉटर ॲग्रीकल्चर (भुवनेश्वर) या संस्थेने साध्या गोड्या पाण्यातील शिंपल्यांपासून गोड्या पाण्यातील  मोत्यांची शेती करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. देशभरात अनेक ठिकाणी त्याच्या प्रशिक्षणाची सोय आहे. आपल्या कृषी विभागानेही शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रशिक्षणाची सोय केली होती. .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pearl cropping by Digvijay Pratap Patil in Sangli