सोलापूरात नो व्हेईकल झोनमुळे संताप

सोलापूरात नो व्हेईकल झोनमुळे संताप

सोलापूर : रोज कोट्यवधीची उलाढाल असलेल्या सोलापुरातील नवीपेठेत "नो व्हेईकल झोन'ची संकल्पना शहर वाहतूक पोलिसांनी राबवायला सुरूवात केल्याने ग्राहक, व्यापारी आणि विक्रेते हैराण झाले आहेत. या "तुघलकी' अध्यादेशाविरूद्ध व्यापाऱ्यांसह सर्वच नागरिकांनी विरोध केला आहे.

शहानिशा करण्याची गरज

शहरातील नवीपेठेला एखाद्या मॉलसारखे स्वरूप आहे. चिवडेवाल्या मारूतीपासून मेकॉनिकी चौकापर्यंत सरळ रेषेत असलेल्या या पेठेत सर्व प्रकारची दुकाने आणि माल मिळतो. शिवाय मेकॉनिकी चौकात मल्टिप्लेक्‍सपासून सिंगल स्क्रीनची सिनेमाघरे आहेत. महाराष्ट्रात अशी वैशिष्ट्यपूर्ण बाजारपेठ कोणत्याही शहरात नाही. तेथे ग्राहकांची नेहमीच गर्दी असते. हवी वस्तू हमखास मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणून सोलापूर शहर आणि जिल्ह्यासह कर्नाटकातील विजापूर, कलबुर्गी येथील ग्राहक येथे खरेदीसाठी येत असतात. मात्र, वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी पूर्ण बाजारपेठेतच "नो व्हेईकल झोन'चा फतवा वाहतूक पोलिस उपायुक्त वैशाली कडुकर यांनी काढला आहे. तो काढण्यापूर्वी कोणतीही शहानिशा केली नाही, पाहणी तर नाहीच नाही. शिवाय कसलाही अभ्यास न करता नियोजनशून्य पद्धतीने त्यांनी हा उपक्रम राबवला आहे. त्याचा नवीपेठ भागात राहणाऱ्या रहिवाशांनाही खूप त्रास होत आहे.
 

अधिकाऱ्यांची मनमानी

सोलापूरात सर्वच अधिकारी मनमानी पद्धतीने योजना राबवतात. मधूनच त्याची अंमलबजावणी थांबवतात. अधिकाऱ्यांना आणि राजकीय नेत्यांना कोणतीही झळ बसत नसल्याने ते मूग गिळून गप्प बसतात. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्‍न लावून धरण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करायला पाहिजेत, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा : पँट उतरवणाऱ्या नगरसेवकावर गुन्हा दाखल

लोक बोलतात -

नवीपेठ हे सोलापूरचं हृदय आहे. निष्कारण तुघलकी फतवे काढून समस्त सोलापूरकरांना वेठीस धरणा-या या अघोरी कृत्याला काय म्हणावे कळत नाही
कालिदास चवडेकर, नागरिक

आधी कृती, मग विचार म्हणजे विचारशून्य कृती.
शशिकांत लावणीस, नाट्यदिग्दर्शक

वाहतुकीच्या शाखेचे सर्वच नियम भयंकर आहेत. हेल्मेटच्या सक्तीच्या संदर्भात चाललेला खेळखंडोबा नेमके काहीच स्पष्ट नाही करीत. नवीपेठेतली नो व्हेईकल योजना म्हणजे विनोदच आहे. शास्री शॉपिंगला जायचे तर "दत्त चौकीतून चौपाडात जा' असे हवालदारच सांगत आहेत. सगळी मनमानी आणि अभ्यासहीन नियोजन वाटते.

जयंत राळेरासकर, रेकॉर्ड कलेक्‍टर

या सर्व चर्चाच आपण सोलापूरकर करतो. पण या अशा मनमानीविरुद्ध काहीही करत नाही. पुणेकर लोकांची टिंगल करतो, पण ते लोक राजकीय मंडळींसह अन्यायकारक गोष्टींवर तुटून पडतात. त्यांच्यामुळे अनेकदा आपल्याकडील सुद्धा हेल्मेटसक्ती रद्द झाली होती.
गिरीश दुनाखे, कथाकार
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com