महापुराच्या संभाव्य भीतीने कृष्णाकाठवासीय गांगरले

सतीश तोडकर
Wednesday, 29 April 2020

कोरोनाच्या महामारीचे संकट दूर होण्यापूर्वीच हवामान खात्याने वर्तविलेल्या यंदाचा पाऊस आणि कृष्णेच्या संभाव्य महापुराच्या भीतीने कृष्णाकाठ गांगरला आहे. महापूर आल्यावर काय करायचे अशा चिंतेत नदीकाठ वावरत आहे. "भय इथले संपतच नाही,' असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

 
भिलवडी, ता. 28 : कोरोनाच्या महामारीचे संकट दूर होण्यापूर्वीच हवामान खात्याने वर्तविलेल्या यंदाचा पाऊस आणि कृष्णेच्या संभाव्य महापुराच्या भीतीने कृष्णाकाठ गांगरला आहे. महापूर आल्यावर काय करायचे अशा चिंतेत नदीकाठ वावरत आहे. "भय इथले संपतच नाही,' असे म्हणण्याची वेळ आली आहे.

गतवर्षी ऑगस्टमध्ये कृष्णेला प्रलयंकारी महापूर आला. तज्ज्ञांचे पाऊसपाण्याचे सर्व अंदाज, ठोकताळे, अनुमान, गृहितके फोल ठरवत कृष्णेने सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात हाहाकार माजवला. वित्तहानीबरोबर पशुधनास मोठा फटका बसला. सर्वच क्षेत्रातील कोट्यवधी रुपयांची हानी झाली. संथ वाहणाऱ्या कृष्णामाईचे हे रौद्र रूप अविस्मरणीय ठरले. 
या शतकातील 2005 व 2006 चा महापूर अकल्पित होता. कमी कालावधीत अधिक पाऊस, त्याने नियोजन कोलमडले,

अलमट्टी धरणाबाबत अपुरी माहिती, कर्नाटक प्रशासनाचा हट्टीपणा याने शतकातील पहिल्या महापुराने मोठे नुकसान झाले, मात्र त्याहीपेक्षा मदतीसाठी आलेले हातही असंख्य होते. त्याचा अनुभव पाठीशी असतानाही गतवर्षी पाणी पातळीचा अंदाज चुकला. कृष्णेची पातळी तुलनेने अचानक 5 ते 6 फुटांनी वाढल्याने तज्ज्ञ, प्रशासन व ग्रामस्थही हडबडले. यावेळीही मदतीचे असंख्य हात पुढे आले. 

या महापुराने नदीकाठच्या शेतकरी, व्यापारी, व्यावसायिकांचे पुरते कंबरडे मोडले. त्यातून कुठे उभा राहतो ना तोच कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारीने गाठले आहे. ही महामारी पुढे किती दिवस, महिने राहणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. 

नुकतेच हवामान खात्याने यंदा शंभर टक्के पाऊसमानाचा अंदाज वर्तवला आहे. कोयना धरणाची क्षमता 105 टीएमसी आहे तर आजवर पन्नास टक्के पाणी वापर झाला आहे. सध्या 53 टीएमसी शिल्लक आहे. ते दोन महिन्यांत म्हणजे पावसाळ्यापूर्वी संपविणे गरजेचे बनले आहे. 

दरवर्षी तलाव, विहीर, कूपनलिका आटल्या. धरणातून पाणी सोडा म्हणण्याची वेळ फेब्रुवारीपासून सुरू असते. यंदा मात्र विपरीत परिस्थिती निर्माण झाली. साठवलेले पाणी तत्काळ सोडा म्हणण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या धक्‍क्‍यातून सावरण्याआधीच जलप्रलयाच्या संकटाने कृष्णाकाठवासीयांमध्ये हबकीच भरली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The people at the bank of Krishna river again in fear of a possibliity flood