आयर्विनच्या पर्यायी पुलाची जागा बदलली; सांगली शहराला नवा रिंग रोड 

The place of alternative bridge for Irwin brigge is replaced; New ring road to Sangli city
The place of alternative bridge for Irwin brigge is replaced; New ring road to Sangli city

सांगली : येथील आयर्विनला पर्यायी पुलाची नियोजित जागा बदलण्यात आली आहे. यापूर्वी तो शेजारी होणार होता; पण आता बाहेरून म्हणजे मूळ विकास आराखड्याप्रमाणे करण्यात येणार आहे. आता हा पूल हरिपूर रस्त्यावरील लिंगायत स्मशानभूमीलगत होणार आहे. त्यासाठी आता सर्व्हे करण्याचे तसेच भूसंपादनाचे आदेश देण्यात आले आहेत.

यापूर्वी हा पूल आयर्विन पुलाशेजारीच करण्याचा मूळ प्रस्ताव आहे. मात्र यास सांगलीवाडीतील नागरिक, शहरातील व्यापारी संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटितपणे विरोध केला होता. याची दखल घेत शासनाने तांत्रिक समितीची बाजू विचारात घेऊन पुलाचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 

याबाबतची अधिक माहिती अशी ः सांगली आणि हरिपूर येथे कृष्णानदीवरील दोन्ही पूल आमदार सुधीर गाडगीळ यांनी भाजपची राज्यात सत्ता असताना मंजूर करून घेतले होते. यातील हरिपूर पूल आता पूर्णत्वाकडे आहे. मात्र आयर्विन पुलाशेजारीच पूल करण्यास विरोध झाला होता. भाजपचेच नेते दिनकर पाटील यांनीदेखील यास विरोध केला होता. या पर्यायी पुलाबाबत वेळीच व्यापारी व विविध पक्ष संघटनांनी विरोधाची भूमिका घेत पुलाची जागा बदलण्याची मागणी केली होती. सांगलीवाडीतील नागरिकांनी तर हे काम बंद पाडले. आधीच्या प्रस्तावामुळे सराफ कट्टा परिसर, कापड पेठ, टिळक चौक, हरभट रस्ता परिसरात वाहनांचा ताण अधिकच वाढणार असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. 

या सर्व बाजूंचा विचार करून पुलाची जागा बदलावी यासाठी कृती समिती स्थापन करून पालकमंत्री जयंत पाटील यांना निवेदन देण्यात आले होते. मंत्री पाटील यांनी पुलाचे काम थांबवण्याचे आदेश दिले. सर्व बाजू समजून घेऊन अखेर पुलाची जागा बदलण्याचा निर्णय झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतची कार्यवाही करताना सर्व्हेसह भूसंपादनाचे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नगररचना विभागाचे अधिकारी शिवप्रसाद धुपक, प्रतीक डोळे, कलीम धावडे, शाहबाज शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना या पुलासाठी बाधित होणाऱ्या शेतजमीन व मालमत्तांचा सर्व्हेचे आदेश दिले आहेत. 

भूसंपादनात अडचणी येणार नाहीत
पुलाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी 30.48 मीटर रुंदीने भूसंपादन केले जाणार आहे. पुढील आठवडाभरात त्यासाठीचे मार्किंग पूर्ण होईल. हा पूल आणि डीपी रस्ता आधीपासूनच आहे. त्यामुळे भूसंपादनात अडचणी येणार नाहीत. 
- दत्तात्रय गायकवाड, पथक प्रमुख, भूसंपादन समिती 

कुणाच्या तरी हट्टापायी निर्णय

आम्ही मंजूर केलेला आयर्विनच्या जवळून जाणारा पूलच योग्य होता. त्याचा बाजारपेठेला फायदा झाला असता. हरिपूरचा पूल पूर्ण झाला, तसा हा देखील पूर्ण होत आला असता. आता जागा बदलल्याने पुन्हा सर्व्हे आणि भूसंपादन करणे सहजपणे होणारे नाही. कुणाच्या तरी हट्टापायी हा निर्णय घेतला गेला आहे. भूसंपादन प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात. जमीनधारकांचा विरोध होऊ शकतो व भरपाई देखील द्यावी लागेल. 
- सुधीर गाडगीळ, आमदार 

पुलाला आमचा विरोध नव्हता

हरिपूर रोडवरून होणारा नवीन पूल प्रस्तावित होता. तो करण्याची आमची मागणी पूर्वीपासूनच आहे. हा रस्ता थेट शंभर फुटीला जोडला जाणार असल्याने कर्नाटकमधून शहरातून जाणाऱ्या वाहनांची गर्दी कमी होईल. आयर्विन पुलाच्या शेजारून जाणाऱ्या पुलालाही आमचा विरोध नव्हता. फक्त तो चिंचबागेतून कापडपेठेतून जाण्यापेक्षा पुलाच्या अलीकडून केला असता तर अडचण नव्हती. 
- दिनकर पाटील, माजी आमदार 

सांगलीला आणखी एक रिंगरोड मिळणार

आता होणारा पूल मूळ विकास आराखड्याप्रमाणे होणार आहे. सांगलीला आणखी एक रिंगरोड मिळणार आहे. कोल्हापूरकडून पेठकडे जाणारी सर्व वाहतूक आता या रस्त्याने परस्पर जाईल. शहरात अनावश्‍यक वाहने येणार नाहीत. कृती समितीने सर्व व्यापारी व नागरिकांच्यावतीने मुंबईत तांत्रिक समितीला पुलाची जागा बदलणे कसे गरजेचे आहे पटवून दिले. 
- शेखर माने, शिवसेना नेते 

लोकांना विश्‍वासात घेऊन पुढे गेले पाहिजे

शहरावरील वाहतुकीचा अतिरिक्त ताण विचारात घेऊन तांत्रिक समितीने पुलाची जागा बदलली हे योग्य झाले. विकास आराखड्याप्रमाणेच निर्णय झाले पाहिजेत. मात्र लोकांचा फायदा आणि तोटा विचारात घेतला पाहिजे. भूसंपादनाची रक्कमही तातडीने मिळाली पाहिजे. लोकांना विश्‍वासात घेऊन पुढे गेले पाहिजे. 
- सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच 

विकासाला आता गती मिळणार

सांगलीवाडीच्या पेठ रस्त्यावरील टोलनाक्‍यापासून वाडी गावठाणाच्या नदीकडील बाजूने भूसंपादन होणार असल्याने या परिसराच्या विकासाला आता गती मिळणार आहे. शेतकऱ्यांनाही भूसंपादनाची चांगली रक्कम मिळेलच आणि शेतजमिनीही महामार्गावर येणार आहेत. 
- अमोल बर्गे, सांगलीवाडी 

मागणी मान्य केल्याबद्दल आभार

आयर्विन पुलाशेजारीच पूल अनावश्‍यक होता. आमची मागणी मान्य केल्याबद्दल आभार. शहर विकासासाठी लोकांना विश्‍वासात घेऊन निर्णय झाले पाहिजेत. 
- समीर शहा, व्यापारी एकता असोसिएशन 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com