Sangli : उसाच्या कांडी लावणीस फाटा देत रोप लावण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sugarcane

उसाच्या कांडी लावणीस फाटा देत रोप लावण

भिलवडी : कृष्णाकाठावर उसाच्या कांडी लावणीस फाटा देत रोप लावणीस शेतकरीवर्ग प्राधान्य देत आहे. मजुरीच्या वाढत्या दरामुळे त्याकडे कल वाढल्याचे चित्र आहे. नदीकाठावर पारंपरिक आडसाली, सुरू, पूर्वहंगामी अशा तीन टप्प्यात ऊस लावण होते. जून - जुलै मध्ये आडसाली लावण होते. त्याची तोडणी चौदा- पंधरा महिन्यांत होते. त्या पिकास दोन पावसाळी हंगाम मिळाल्याने वाढ चांगली होते.

टनेजही वाढते. तोडणी लवकर झाल्याने ऊसबिल तत्काळ पदरात पडते. काही शेतकरी खरिपाचे सोयाबीनचे पीक घेऊन सुरू, पूर्वहंगामी लावण करतात. यामध्ये पुढील पिकास चांगला बेवड मिळतो. नव्याने जमिनीच्या सऱ्या सोडाव्या लागत नाहीत. सोयाबीनच्या उत्पन्नाचे पैसे पुढील लागवडीसाठी हाती येतात. सध्या कांडी लावणीसाठी एकरी साडेचार ते पाच हजार रुपये मजुरी आहे. यामध्ये बियाणे तोडून कांडी लावण करून दिली जाते. कट वाकुरीसाठी सोळाशे ते अठराशे, बियाणे वाहतुकीसाठी वाढीव मजुरी आकारली जाते.

महागाईच्या नावाखाली दरवर्षी त्यामध्ये वाढ होत आहे. ऊस बियाणाचा दर गुंठ्यास पाच ते आठ हजार रुपये आहे. एक ते दीड गुंठे बियाणे एकर लावणीसाठी लागते. हा सर्व खर्च पाहता एकर ऊस लावणीसाठी सुमारे बारा ते पंधरा हजार खर्च होतो.याउलट तेवढ्याच खर्चात रोप लावण होते. चार फुटी सरी, रोपामध्ये दीड ते दोन फुटांचे अंतर राखल्यास एकरी पाच ते सहा हजार रोपे लागतात. त्याच्या लावणीसाठी एक ते दीड खर्च येतो. सध्या नदीकाठावर मोठ्या प्रमाणात ऊस नर्सरी आहेत. एक रुपया सत्तर पैसे ते दोन रुपये चाळीस पैसे असा रोपाचा दर आहे. काही नर्सरी रोपे पोहोच करण्याबरोबर त्याची लावणीही करून देत आहेत. शेतास पाणी दिले की दुसऱ्या दिवशी रोपे लावली जातात.

दिवसाकाठी चार- पाच एकर क्षेत्रात रोप लावण केली जात आहे. रोपे सेट होण्यासाठी खते, टॉनिक, कीटकनाशकाच्या अंतराने दोन- चार आळवणी, फवारणी घ्याव्या लागतात. रोपांनी चांगली मुळे धरल्यानंतर वाढ जोमाने होते. वाढते मजुरीचे दर, ऊस लागवडीमध्ये नवी पद्धत यामुळे तरुण शेतकरीवर्गाचा रोप लावणीकडे कल वाढत आहे.

loading image
go to top